अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहीजे ; रुपाली चाकणकरांचा सदाभाऊंवर निशाणा | पुढारी

अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहीजे ; रुपाली चाकणकरांचा सदाभाऊंवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री केतकी चितळे हीचे समर्थन करणाऱ्या काही विकृत प्रवृत्ती समाजात आहे. समाजातून अशी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आ. सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडून राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये सोमवारी (दि.१६) खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात खा. शरद पवार यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. संकटाच्या काळात राज्य सांभाळणाऱ्या खा. पवार यांच्याकडे जनता गुरूतुल्य व्यक्तिमत्व म्हणून बघते. परंतु, अशा गुरूतुल्य व्यक्तीविरूद्ध वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केतकीसारख्या व्यक्ती करत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. केतकीचे समर्थन करणाऱ्या आ. खोत यांचाही चाकणकर यांनी समाचार घेताना समाजातील अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहीजे, असे त्या म्हणाल्या.

विरोधकांनी महाराष्ट्र अशांत करण्याचा विडा ऊचलला आहे. सत्तेत असताना २४ तास पोलिस संरक्षणात फिरणाऱ्यांना आज विरोधात बसावे लागल्याने एकदिवसात त्यांचे पोलिसांबद्दलचे मत परिवर्तन झाले. त्या व्यक्ती महाराष्ट्र आणि पोलिसांची बदनामी करत असल्याचे सांगत चाकणकरांनी खोत यांच्यावर टीका केली. तसेच राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम असून ते चांगले काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांना सल्ले देण्याची गरज नसल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनता अशा विकृत मनोवृत्तीला भीक घालणार नाही, असा विश्वास चाकणकरांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button