पुरंदरला इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

पुरंदरला इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
Published on
Updated on

जीवन कड

सासवड : नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे 5 गट आणि पंचायत समितीच्या 10 गणांसाठी निवडणूक होणार आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने तसेच जिल्हा परिषदेचा 1 गट आणि पंचायत समितीच्या 2 गणांची वाढ झाल्याने उमेदवारांसह नेत्यांचाही खरा कस लागणार आहे.

आघाडीचे सूत्र लागू होणे कठीण

महाविकास आघाडीचे सूत्र पुरंदरमध्ये लागू होणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे. येथे काँग्रेस आणि शिवसेना कदापि एकत्र येणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढण्याची चर्चा आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होत असल्याने ओबीसी नेत्यांना कोणता पक्ष कशी संधी देतो आणि राष्ट्रवादीची दोन आणि तीन क्रमांकाची फळी कोणती भूमिका घेते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

हे सर्व होत असताना ग्रामपंचायती आणि नुकत्याच झालेल्या विकास सोसायट्यांच्या निकालांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पुरंदर तालुक्यात काँग्रेसकडे आमदारकी, पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद, सासवड आणि जेजुरी नगरपालिका आहे. बाजार समिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आहे. अनेक विकास सोसायट्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे, तर ग्रामपंचायतींमध्ये कमी-अधिक प्रमाणात सेना आणि दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीची सत्ता शिवसेनेकडे होती. तालुक्यातील 4 पैकी 3 जि. प. गट आणि 6 पं. स. गण शिवसेनेकडे आणि 1 जि. प. गट आणि 2 पं. स. गणात काँग्रेसचे सदस्य होते. राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी झाल्याने पक्षाला ताकद देण्यासाठी डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पुन्हा दिले गेले आहे.

स्थानिक दिग्गजांना विरोध आत्मचिंतन करायला लावणारा

मागे झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुक्याचे राजकारण करणार्‍या अनेक दिग्गजांना स्वतःच्या गावातूनच विरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. यात सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या दिगज्जांना बसला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींचा हा निकाल सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारा आहे. त्यात एक गट वाढल्याने यापूर्वीची रचना पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे नवीन व्यूहरचना करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.

मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही अपवाद वगळता इतर सर्वच ठिकाणी स्थानिक पातळीवर सोयीनुसार काँग्रेस – शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप, भाजप-काँग्रेस विचारांच्या कार्यकत्र्यांचे, तर काही मोजक्या ठिकाणी स्थानिक आघाड्यांवर पॅनेल उभे करून चुरशीच्या लढती झाल्या. सेनेने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकविल्याचा दावा केला होता. तर, यापूर्वी प्रथम क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक ग्रामपंचायतींची सत्ता त्यांच्या हातून निसटली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news