धुळे : बोगस डॉक्टरचा भांडाफोड, व्यावसायिक गाळ्यात थाटला होता दवाखाना | पुढारी

धुळे : बोगस डॉक्टरचा भांडाफोड, व्यावसायिक गाळ्यात थाटला होता दवाखाना

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी व कारवाईसाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समितीतर्फे बोगस वैद्यकीय व्यवसाय शोध समितीच्या शोधमोहिमेत एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. पश्चिम पट्टयातील वार्सा फाटा येथे शोधमोहीम सुरू असतांना सावरीमाळ येथील बोगस डॉक्टरबाबत समितीला माहिती मिळाली. समितीचे सदस्य सावरीमाळ येथे पोहोचले. त्यावेळी नवापूर पिंपळनेर रस्त्यालगत असलेल्या पोसल्या मान्या वळवी यांच्या शेतातील व्यावसायिक गाळ्यात बोगस डॉक्टर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा देत होता. मात्र आपल्या शोधासाठी पथक आल्याचे समजताच हा बोगस डॉक्टर तेथून फरार झाला.

समितीने ग्रामस्थांकडे अधिक चौकशी केली असता संबंधित बोगस डॉक्टरचे नाव पांडे असल्याचे समजले.  त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही तो अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करत रुग्णांच्या जिवाशी खेळत होता. समितीने त्यांच्या दवाखान्यात छापा टाकून तेथील नियमबाह्य औषधांसह अन्य साहित्य जप्त केले. बोगस डॉक्टर शोधमोहीम समितीचे अध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, पंचायत समितीचे प्रभारी आरोग्य विस्ताराधिकारी एम. एस. शिंपी, कुडाशी आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक निकम, औषध निर्माण अधिकारी संजय महाले, आरोग्य सहाय्यक एस. एस. बोरसे, बी. आर. कासार, एस.आर.चौरे, अल्का गावित, शांतिलाल साळवे, कन्हैया अहिरे आदींनी ही कारवाई केली. कारवाईच्या वेळी गणेश मावची, प्रकाश गावित, शेजारील दुकानदार, दीपक मावळी, रेवाजी राऊत, संजय महाले, अल्का गावित आदी पंच उपस्थित होते.

डॉक्टर झाला फरार…

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय थाटत आदिवासी रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाईसाठी समिती गेली होती. या समितीची भनक लागताच डॉ. पांडे फरार झाला. समितीने त्याच्या दवाखान्यावर छापा टाकत तेथून औषधांसह अन्य साहित्य जप्त केले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंचनाम्याची प्रत कुडाशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली.

बोगस डॉक्टरवर कारवाई प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी. हितेंद्र गायकवाड व पथक.

हेही वाचा :

Back to top button