राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटेल : बाळा नांदगावकर | पुढारी

राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटेल : बाळा नांदगावकर

मुंबई : पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटेल, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज (दि.११) दिला. राज ठाकरे आणि नांदगावकर यांना जीवे ठार मारण्याचे धमकीचे पत्र आले आहे. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नांदगावकर म्हणाले की, मला आणि राज ठाकरे यांना जीवे ठार मारण्याचे पत्र मिळाले आहे. परंतु राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, हे लक्षात ठेवावे. राज ठाकरे यांच्या सुरक्षितेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर अजानविरोधात भूमिका घेतल्यामुळे हे धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात अजानविरोधातील भूमिकेचा उल्लेख करण्यात आला आहे. धमकीच्या पत्रात उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींबाबत गृहमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, जवळपास २८ हजार मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी काल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यामध्ये ही माहिती देण्यात आली होती. या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. काल त्यांनी पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त यांचीदेखील यासंबंधी भेट घेतली होती. आज सकाळी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी बाळा नांदगावकर गेले होते. या भेटीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईवर चर्चा झाल्याचे समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१०) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांना दहशतवाद्यासारखे शोधत असल्याचे म्हटले आहे. आरोपीला शोधणे हे पोलिसांचे कामच आहे. पोलीस आपले काम करत आहे. ज्या मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button