केंद्रावर टीका करण्यापेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे पवारांनी लक्ष द्यावे : ना. फडणवीस | पुढारी

केंद्रावर टीका करण्यापेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे पवारांनी लक्ष द्यावे : ना. फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी केंद्राच्या कारभारावर सातत्याने टीका करण्यापेक्षा राज्यातील प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. तसेच कामकाजात सुधारणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला द्यावा, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांना लगावला.

मंगळवारी (दि. 10) नाशिक दौर्‍यावर आलेल्या ना. फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजद्रोह आणि अन्य प्रश्नांवरून खासदार पवार यांनी केंद्र सरकारला केलेले लक्ष्य याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. फडणवीस यांनी त्यावर बोलताना, राज्यासमोर वीज, शेतकर्‍यांचे प्रश्न, इंधनाचे दर असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे ते प्रश्न सोडवण्यासाठी पवार यांनी लक्ष घालावे, अशा शब्दांत पवारांवर तोफ डागली. महाराष्ट्रात सध्या ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरू आहे. मंत्री जेलमधून कारभार चालवत असल्याने त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे. महाराष्ट्राची वाटचाल अराजकतेकडे सुरू असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय उघडल्याबाबत महाविकास आघाडी सरकारने भाजपवर सडकून टीका केली. या टीकेचादेखील फडणवीस यांनी यावेळी समाचार घेताना, मुंबई व महाराष्ट्र हे पॉवरफुल्ल आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने राज्यात कार्यालय उघडल्याने लगेचच विरोधाचा सूर आळवणे चांगले नसल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना ना. फडणवीस यांनी, ते माझे चांगले मित्र असून आमच्या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

खा. ब्रीजभूषण यांच्याशी चर्चा करणार
उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार खा. ब्रीजभूषण यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला विरोध दर्शविला आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, प्रभू श्रीराम यांना शरण जाण्यापासून कोणालाही विरोध करण्याची गरज नाही. तसेच याप्रश्नी खा. ब्रीजभूषण यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button