मायणी ; पुढारी वृत्तसेवा : मायणी येथील मेडिकल कॉलेज आ. जयकुमार गोरे यांच्याकडे काही अडचणीमुळे पार्टनरशिपमध्ये देण्यात आले. मात्र, संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी अॅग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज भागवण्याचे नियोजन झाले होते. तथापि सन 2019 पासून आज अखेर आ. गोरे यांनी संस्थेच्या कर्जाचा एक रुपयाही भागवला नाही. तसेच हे वैद्यकीय महाविद्यालय फुकट बळकावण्यासाठी आ. गोरेंकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्या विरोधात कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप दिपक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
आ.जयकुमार गोरे यांच्याकडे संस्थेचे असलेली कर्जे भागवण्यासाठी पार्टनरशिप देण्यात आली. संस्थेचे विद्यमान खजिनदार व आ. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांनी मात्र संस्थेविरोधात ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र संस्थेने कोणताही भ्रष्टाचार न केल्याने पळपुटी भूमिका न घेता डॉ. एम. आर. देशमुख हे कर नाही तर डर कशाला म्हणून ईडीच्या चौकशीस सामोरे गेले. तसेच तेथील चालू असलेले आयुर्वेद महाविद्यालय बंद पडावे व तेथील विद्यार्थी अन्य महाविद्यालयात सामील करुन घ्यावे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचाकडे आमदारांनी बनावट तक्रार केली. तसेच चालू असलेले महाविद्यालय सन 2021-22 साठी आलेली मान्यता सत्तेचा गैरवापर करुन ही मान्यता नामंजूर करुन घेतली. वास्तविक या संस्थेच्या माध्यमातून आमदारांनी कोरोना काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. मात्र आ. गोरे यांच्यावर कारवाई न करता आता ज्यांनी ही संस्था निर्माण केली त्यांच्यावरच कारवाई करुन काय साधले जात आहे. सन 2012-13, 13-14 व 14-15 या तीन वर्षात प्रवेश घेऊन एम.बी. बी.एसचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र महाराष्ट्र शासनाने अनियमित प्रवेश केल्याने 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. शासनाने हा दंड कोर्टात भरला. त्यामुळे सदर महाविद्यालयावर महसूल विभागाने कारवाई करुन येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. विद्यार्थ्यांकडून जमा केलेली प्रवेश फी संस्थेच्या विकासात्मक कामासाठी वापरल्याने संस्था आर्थिक अडचणीत आली व ते देणे अशक्य झाल्याने संस्थेने सदर महाविद्यालय आ. जयकुमार गोरे यांच्याकडे चालवण्यास दिले होते, असेही दिपक देशमुख यांनी म्हटले आहे.
डॉ. एम. आर. देशमुख यांनी या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून शेकडो हाताना रोजगार तर दिलाच पण हजारो रुग्णावर मोफत उपचार केले. मायणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोफत व वेळेवर उपचार मिळावा. तसेच कष्टकरी शेतकर्यांच्या मुलांना या कॉलेजच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेऊन लोकांच्या सेवा करता यावी याच उद्देशाने डॉ. एम आर देशमुख यांनी या कॉलेजची स्थापना केली. परंतु शासनाच्या काही धोरणामुळे हे कॉलेज अडचणीत आल्याने कॉलेजच्या आर्थिक अडचणी वाढल्या. खरेतर डॉ. एम. आर. देशमुख यांच्यासारख्या सामाजिक भान ठेवणार्या लोकांना जर असा त्रास व्हायला लागला तर समाजात चांगुलपणा दाखवायला लोक पुढे येणार नाहीत. देशमुख यांना पैसा कमवायचा असता तर त्यांनी हजारो लोकांच्यावर मोफत उपचार केले नसते. नुसती उपचारच नव्हे तर या रुग्णांना जेवणापासून नेणे -आणण्याची मोफत सोय केली होती. या मागचा उद्देश गरीब व जनतेची सेवा करणे एवढाच होता. यासंदर्भात सर्व चौकशींना सामोरे
जाण्याचे संस्थेने ठरवले आहे. जो भ्रष्टाचार केलाच नाही तो भ्रष्टाचार लोकांपुढे मांडून लोकांची दिशाभूल करुन हे वैद्यकीय महाविद्यालय बळकावण्याचा प्रयत्न आ. जयकुमार गोरेंकडून चालू असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.