कराड : उपजिल्हा रुग्णालयाचे आंदोलन तीव्र | पुढारी

कराड : उपजिल्हा रुग्णालयाचे आंदोलन तीव्र

कराड ; पुढारी वृत्तसेवा : येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दूर कराव्यात या मागणीसाठी प्रहार पक्षाचे मनोज माळी व भानुदास डाईंगडे सहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रहार संघटनेच्या वतीने कोल्हापूर नाक्यावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मनोज माळी व भानुदास डाईंगडे वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाबाहेर उपोषणास बसले आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेसह आरपीआय महिला आघाडी, भीम आर्मी, दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंंगळवारी कोल्हापूर नाक्यावर शहरातून बाहेर येणारा रस्ता अडवत रास्तारोको केला. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

कराड, पाटणसह कडेगाव तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ, डॉक्टर, कर्मचारी आदी पदे रिक्त आहेत.आरोग्य सेवेबाबत गैरसोयी आहेत. याबाबत मनोज माळी पाच वर्षांंपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनासह मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रूग्णालयाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून मनोज माळी व भाईंगडे यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजितराव बानगुडे व भानुदास डाईंगडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर नाका येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी, शिवाजी चव्हाण, आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी टोणपे, दिव्यांग संघटनेचे अशोक पवार, वैभव चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

..तर आंदोलन भडकेल

उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दूर झाल्यास हजारो गरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मनोज माळी पाठपुरावा करीत आहेत. सहा दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड जात नाही. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास प्रहारच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Back to top button