नाशिक : ‘बिटको’त वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, मनपाचा ‘या’ महाविद्यालयासोबत करार | पुढारी

नाशिक : ‘बिटको’त वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, मनपाचा 'या' महाविद्यालयासोबत करार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या नवीन बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मविप्र समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासोबत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली संलग्नता मिळविण्याकरता आवश्यक असणारा सामंजस्य करार सोमवारी (दि. 9) करण्यात आला.

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नता मिळविण्याच्या अटीची पूर्तता करण्याबाबत मनपा प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार संबंधित आस्थापनांच्या स्वाक्षर्‍या झाल्याने बिटकोच्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. सामंजस्य करार राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे सादर केला जाणार आहे. बिटको रुग्णालय अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या एमबीबीएस डॉक्टरांना महापालिकेच्या रुग्णालयात अभ्यासक्रमाच्या कालावधीत सेवा देणे बंधनकारक राहणार असल्याने मनपा रुग्णालयांतील मनुष्यबळाची असलेली कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे संबंधित प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

सीपीएस कॉलेजच्या मदतीने सुरू होणार्‍या मनपाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला मर्यादा येण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाला सादर केला होता. त्यावर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आणि तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्यात बैठक होऊन राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचा ना हरकत दाखला मनपाने सादर करण्याची सूचना कानिटकर यांनी केली होती. त्यादृष्टीने वैद्यकीय परिषदेकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, परिषदेने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नता असल्याचा सामंजस्य करार सादर करण्याबाबतही कळविले असता मनपाने मविप्रच्या कै. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधत संलग्नता देण्याची मागणी केली होती.

विद्यापीठाला ना हरकत दाखला पाठविणार
महापालिकेचा मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर करार झाल्यानंतर मनपाला प्रशिक्षणासाठी येथील मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरता येणार आहे. बिटकोत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाचीही संलग्नता मिळणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या ना हरकत दाखल्यासाठी करार दिल्ली येथे सादर केला जाणार आहे. ना हरकत दाखला मिळाल्यानंतर तो विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला जाणार असल्याचे मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button