छगन भुजबळ : वटहुकूम काढून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण वाचवावे! | पुढारी

छगन भुजबळ : वटहुकूम काढून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण वाचवावे!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपने आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले, अशा शब्दांत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने आता वटहुकूम काढून ओबीसी आरक्षण वाचवावे, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशलाही धक्का दिला. मध्य प्रदेश सरकारला पुढील दोन आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली.

संपूर्ण देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. भाजपशासित राज्यानेही ही ट्रिपल टेस्ट केली नाही. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपने उभा केलेल्या व्यक्तींनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला. हा खेळ देशाला महागात पडला असून, आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले, अशी टीका भुजबळ यांनी भाजपवर केली.

ओबीसी आरक्षणाबाबतची मुख्य जबाबदारी केंद्राची आहे. ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर वकिलांशी चर्चा करावी आणि अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवावे, असे भुजबळ म्हणाले.

Back to top button