अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या : राहुल गांधी | पुढारी

अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या : राहुल गांधी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : मोदीजी, जेव्हा रुपयाची घसरण होत होती तेव्हा तुम्ही मनमोहनजींची चेष्टा करत होता. आता पाहा, रुपया सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. पण, तरीही आम्ही तुम्हाला डोळे झाकून दोष देत नाही आहोत. अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या, प्रसारमाध्यमांतील हेडलाईन्सवर नको… अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे.

डॉलर-रुपया विनिमय दरात रुपयाचे सतत होत असलेल्या अवमूल्यनावरून राहुल गांधी यांच्यासह तमाम काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्यांनी एकामागोमाग एक ट्विट करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

पक्षाचे प्रमुख प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपयाचा विनिमय दर 77.41 रुपये झाला आहे. 75 वर्षांत रुपयाची इतकी कधीही घसरण झाली नाही. मोदी सरकारमध्ये भारतीय रुपया अतिदक्षता विभागात गेला आहे. आता रुपयाने भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील सदस्यांच्या वयाचा आकडाही ओलांडला आहे. याचे कारण काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रुपया निचांकी पातळीवर आला आहे. मोदी मुख्यमंत्री असते तर त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून देशद्रोही ठरवले असते. पण मोदी आता मौन साधून आहेत.

Back to top button