सातारा : पोलिसाला लाचप्रकरणी अटक, कोठडी | पुढारी

सातारा : पोलिसाला लाचप्रकरणी अटक, कोठडी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : लोणंद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोघांना मदत करण्यासाठी व गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी पोलिस हवालदार भगवान किसन पवार (वय 51, मूळ रा. कोळकी,
ता. फलटण) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही रंगेहाथ कारवाई केली असून पोलिसाला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार युवक असून तो लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. चार दिवसांपूर्वी गावातील यात्रेवेळी भांडणे झाली. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबतची पुढील कारवाईची प्रक्रिया पोलिस हवालदार भगवान पवार तपासी अधिकारी म्हणून त्यांनी पाहिली. यावेळी एसीबी प्रकरणातील तक्रारदार हवालदार पवार याला भेटल्यानंतर त्यांनी ‘तुला व तुझ्या भावाला गुन्ह्यात मदत करतो. तसेच पुढे गुन्ह्यातून बाहेर काढतो. त्यासाठी 20 हजार रुपये दे,’ असे म्हणून लाच मागितली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार युवकाने सातारा एसीबीकडे संपर्क साधला. उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार दाखल करुन पोनि विक्रम पवार यांना तपासाच्या सूचना दिल्या. एसीबीने तीन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर पडताळणी केली असता दि. 7 मे रोजी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम सोमवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने ट्रॅप लावला. सोमवारी सायंकाळी पैसे घेतल्यानंतर एसीबीने रंगेहाथ पकडले. एसीबीचा ट्रॅप लागल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्यानंतर त्याला घाम फुटला. लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी लाचेची मागणी मागितल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.

गृहमंत्री दौर्‍यावर असताना कारवाई…

राज्याचे गृहमंत्री सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असताना लोणंदच्या पोलिसाने लाच स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी गृहमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट देखील दिली होती. राज्यातील इतर मंत्री व व्हीआयपी असताना एकीकडे पोलिसांचा बंदोबस्तामुळे घामटा निघाला असताना दुसरीकडे पोलिस लाच घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसाला कोर्टात हजर केल्यानंतर लाच प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह विविध मुद्यांचा तपास करायचा असल्याचे एसीबीने कोर्टाला सांगितल्याने पोलिसाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Back to top button