नाशिक : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी; सरासरी दर 900 रुपयांवर : उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत | पुढारी

नाशिक : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी; सरासरी दर 900 रुपयांवर : उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारी महिन्यात प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये दर मिळणार्‍या कांद्याला सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी 900 रुपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच. पण, वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 1000 ते 1200 वाहनांतून कांदा आवक होते. सध्या बाजार समितीत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे. कांदा पीक नगदी असले, तरी ते जुगारासारखे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पन्न मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. भाव असतो, तेव्हा कांदा नाही आणि कांदा आहे, तर भाव नाही, अशी अवस्था या पिकाची झाली आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. 10 वर्षांपूर्वी कांद्याला साधारण एकरी खर्च 20 हजारांपर्यंत येत होता, तोच खर्च आज 70 हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे, तर रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, शेतमालाचे दर काही वाढताना दिसत नाहीत.

उत्पादकांमधून संताप व्यक्त : कांद्याचा सरासरी दर एक हजार रुपयांच्या आत आले आहेत. लागवड खर्च आणि विक्री खर्च वजा केल्यास, शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संघटनांकडून अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कांदा जरा महागला की, ओरड होते परंतु, शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विक्री करावा लागत असताना, अशा वेळी ओरड का होत नाही, असा प्रश्न उत्पादकांकडून केला जात आहे.

तोंडचे पाणी पळाले : कांद्याच्या दरात होणारी घसरण यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा लागवड, साठवणूक व विक्री व्यवस्थापन यामध्ये बळीराजाला अनेक अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. त्यातच महागडी खते, वाढते इंधनाचे भाव, नियमित विजेचा प्रश्न याचाही फटका बळीराजाला बसला आहे.

कृउबा समितीत उन्हाळ कांद्याला किमान 400, कमाल 1,451, तर सरासरी 970 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. – सुनील गवळी, शेतकरी

हेही वाचा :

Back to top button