धुळे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारत कार्यशाळा नुतनीकरणासाठी 1 कोटीचा निधी मंजूर

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकिय इमारतीसह कार्यशाळेच्या नुतनीकरण व बांधकामासाठी 1 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचार्यांची गैरसोय दूर होणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
धुळे येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेची प्रशासकिय इमारत व कार्यशाळा क्र.1 ची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे आ.कुणाल पाटील यांनी दुरुस्ती व नुतनीकरणाची मागणी करत पाठपुरावा केला. तसेच पाटील यांनी प्रधान सचिव कौशल्य व उद्योजकता विभागाला पत्रही पाठवले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था 1959 मध्ये स्थापन झाली असून येथे विद्यार्थ्यांना 29 व्यवसाय अभ्यासक्रम मंजूर आहेत. एकूण 85 तुकड्यांमध्ये एक हजार विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त प्रशिक्षणार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या संस्थेचा शैक्षणिक दर्जा अतिशय उत्तम असून उत्तर महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी त्यास प्राधान्य देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी या संस्थेतील प्रशासकिय इमारत व कार्यशाळा क्र.1 च्या नुतनीकरण व बांधकामाची आवश्यकता असल्याची मान्यता मिळून त्यास मंजुरी देत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. पाटील यांनी केली. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून 1 कोटी 41 लक्ष रुपये मंजूर करण्यात आल्याची माहीती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच देशहित : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
- बारामती : बोगस कागदपत्रे सादर करत फायनान्स कंपनीची ४५ लाखांची फसवणूक, ११ जणांवर गुन्हा
- पिंपरी : पालिका शहरात उभारणार जिजाऊ क्लिनिक