बारामती : बोगस कागदपत्रे सादर करत फायनान्स कंपनीची ४५ लाखांची फसवणूक, ११ जणांवर गुन्‍हा | पुढारी

बारामती : बोगस कागदपत्रे सादर करत फायनान्स कंपनीची ४५ लाखांची फसवणूक, ११ जणांवर गुन्‍हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा: कर्ज प्रकरणांसाठी फायनान्स कंपनी व बारामतीतील सराफी पेढीला बोगस कागदपत्रे सादर करत ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ११ जणांविरोधात फसवणूकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सोहेल शेख (रा. शेखवाडी, जंक्शन, ता. इंदापूर), असिफ सय्यद, अभिजित रामनाथ शेळके (रा. बेलवाडी, ता. इंदापूर), बाळू सोनबा वाघमोडे (रा. हनुमंतवाडी, ता.इंदापूर), बाबा मोहन गायकवाड (रा. चिखली, ता. इंदापूर), अक्षय बापू मोहिते (रा. शेळगाव, ता. इंदापूर), धुळा पांडूरंग शेंडगे (रा. एकशिव, ता.माळशिरस, जि. सोलापूर), बाळासो राजाराम पवार (रा. इंदापूर रोड, बारामती), नितीन बबन पवार (रा. माळेगाव, ता. बारामती), ओंकार हनुमंत शिंदे (रा. तांदूळवाडी, बारामती) व सोहम (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनुराग महेंद्र अरोरा (रा. ॲमेनोरा पार्कटाऊन, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अनुराग महेंद्र अरोरा हे लिक्विलोन फायनान्स कंपनीत २०१८ पासून काम करतात. लिक्विलोन फायनान्स कंपनीकडून बारामतीतील एका प्रसिद्ध सराफी पेढीतील दुकानातून दागिने घेण्यासाठी ग्राहकांना कर्ज पुरवठा केला जात होता. त्यासाठी संबंधित पेढी कर्जदाराकडून पॅन, आधार, पगार स्लिप, बॅंक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न अशी कागदपत्रे घेतली जात होती. या ११ जणांनी खोटे बॅंक स्टेटमेंट, आयटीआर सादर करून या ४५ लाख रुपयांचे कर्ज दागिने खरेदीसाठी घेतले. त्यापोटी दागिने खरेदी केले. त्यानंतर पुन्हा सात प्रकरणे त्यांनी दाखल केली.

लिक्विलोन फायनान्स कंपनीने कर्ज प्रकरणांची फाईल बारकाईने तपासली असता सर्वांची बॅंक स्टेंटमेंट एकसारखीच असल्याचे दिसून आले. लिक्विलोन फायनान्सने तातडीने सराफी पेढीला यासंबंधी कल्पना दिली. पेढीने या संशयितांना फोन केले असता त्यांनी फोन घेतले नाहीत. बाहेरगावी असल्याचे सांगत उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. लिक्विलोन कंपनीला आपल्याकडे बनावट कागदपत्रे सादर करत या ११ जणांनी कर्ज घेतल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button