नांदेडमध्ये घातपाताचे षडयंत्र हरियाणा पोलिसांनी उधळले | पुढारी

नांदेडमध्ये घातपाताचे षडयंत्र हरियाणा पोलिसांनी उधळले

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ः नांदेडमध्ये घातपात घडविण्याच्या उद्देशाने दिल्ली येथून आरडीएक्स आणि घातक शस्त्रे घेऊन नांदेडकडे निघालेल्या चार खलिस्तानी अतिरेक्यांना हरियाणा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरून अटक केली. घातपाताचे षडयंत्र पाकिस्तानच्या आयएसआयच्या आश्रयास असलेल्या कुख्यात हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंधाने रचले होते. रिंधाचे खलिस्तानी आणि आयएसआयचे कनेक्शन प्रथमच उघड झाल्याने पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. या संदर्भात आम्ही हरियाणा पोलिसांशी संपर्कात असून त्यांच्याकडून माहिती मिळताच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

काही वर्षापूर्वी कुख्यात वॉण्टेड रिंधाने नांदेडमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. गुन्हेगारी कारवाया करताना त्याने दोन जणांचे खून केले होते. मागील 4-5 वर्षापासून तो फरार असून अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु अनेक व्यापार्‍यांकडून त्याचे साथीदार नियमितपणे खंडणी उकळत असल्याचे मागील काही घटनांवरून पुढे आले आहे. खंडणी देण्यास नकार देणार्‍या व्यापार्‍यांवर गोळीबारही करण्यात येत असल्याने व्यापार्‍यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. मात्र रिंधाच्या नावाने काही भूरटे व्यापार्‍यांकडून खंडणी उकळत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

सध्या रिंधा हा पाकिस्तानची मुख्य गुप्तहेर संघटना आयएसआयच्या आश्रयास असल्याचे पुढे आले आहे. तसेच खलिस्तानी अतिरेक्यांसोबतचे त्याचे कनेक्शनही असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये बसूनच रिंधाने हे षडयंत्र रचले आहे. नेपाळमार्गे रिंधा पाकिस्तानात पोहोचला.

इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या सूचनेनुसार हरियाणा पोलिसांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरून नांदेडकडे निघालेल्या गुरूप्रित, अमनदीप, परविंदर आणि भूपिंदर या चार अतिरेक्यांना अटक केली. यातील तीन फिरोजपूर आणि एक लुधियानाचा असल्याची माहिती हरियाणा राज्यातील कर्नालचे पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिली.

हे चारही अतिरेकी रिंधाच्या इशार्‍यावर काम करत होते. रिंधानेच त्यांच्यापर्यंत आरडीएक्स आणि शस्त्रे पाठविली होती आणि ते तेलंगणा राज्यातील अदिलाबाद येथे पोहोचविण्यास सांगितले होते. अदिलाबाद हा नांदेडचा सिमावर्ती जिल्हा आहे. येथून या अतिरेक्यांना मोठी रकम मिळणार होती. यापूर्वीही या आरोपींनी नांदेडमध्ये स्फोटक आणि घातक शस्त्रे पुरविली होती. रिंधा हा ड्रोनच्या सहाय्याने पुरवठा करत होता आणि मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने लोकेशन पाठवायचा. त्यानंतर आरडीएक्स व घातक शस्त्र त्याने दिलेल्या ठिकाणावर पोहोचविले जात असत.

Back to top button