भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच देशहित : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात | पुढारी

भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच देशहित : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नांदेड, पुढारी वृत्तसेवाः भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे राज्य व देशाच्या हिताचे असून, यासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे प्रयत्न करत आहे, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त  ते नांदेडमध्ये आले होते, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी थोरात म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची कार्यपध्दती आम्हाला मान्य नाही, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे राज्य व देशाच्या हिताचे असून महाविकास आघाडीतील तिन्‍ही पक्ष वेळोवेळी आपआपल्या पध्दतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काम करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

मुंबईमधील निवडणुकीमध्ये भाजपला सत्तपासून दूर ठेवणार का? असे विचारले असता, ते म्हणाले की, याबाबत तिन्‍ही पक्ष एकत्रितपणे भूमिका ठरवतील. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून, ओबीसींच्या प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकारला कोणतेही अपयश आले नाही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आघाडीतील सर्व पक्षांना एकत्रीत घेवून निर्णय घेतले आहेत. जे ठराव सभागृहात घेण्यात आले आहेत, ते आम्ही एकमताने घेतले आहेत.

निर्णय घेत असताना सरकार व विरोधक असा कोणताही भेदभाव करण्यात आला नाही, निवडणुकांसंदर्भात न्यायालयाने निर्णय दिला असून याची पडताळणी करून निवडणूक आयोगाकडून निवडणुका कधी घ्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, असेही थोरात यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, जि.प. सदस्या डॉ. मीनल पा. खतगावकर  उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button