धुळे : विरोधकांनी वर्चस्वाच्या पोकळ वल्गना करु नये : आ. कुणाल पाटील | पुढारी

धुळे : विरोधकांनी वर्चस्वाच्या पोकळ वल्गना करु नये : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा : येथील बिनविरोध निवडणूक झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर काँग्रेसचेच वर्चस्व आहे. सोसायटीमध्ये काही जागांच्या लालसेपाटी विरोधकांनी निवडणूका लादल्या होत्या. मात्र येथेही त्यांना पराभव स्विकारावा लागला. तालुक्यातील जनता विकासासोबत असल्याने तालुक्यातील व जिल्हयातील कोणत्याही निवडणूकीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे विरोधकांनी पोकळ वल्गना करु नये, असे थेट आव्हानच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी दिले.

धुळे तालुक्यातील बोरविहीर गटातील गावांमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांचा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते रानमळा येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यकर्ता,पदाधिकार्‍यांचा योग्यवेळी सन्मान व सत्कार झाला पाहिजे. त्यामुळे त्यांना एक नवीन उर्जा मिळत असते. गावागावातील विविध निवडणूका बिनविरोध झाल्या तर वाद निर्माण होणारच नाही. हेवेदावे, व्देष बाजूला ठेवून गावाच्या एकात्मतेसाठी व विकासासाठी निवडणूका बिनविरोध झाल्या पाहिजे. विरोधकांना गावागावात निवडणूका लावून आपल्याही काही जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती मात्र तेथेही विरोधकांना पराभवच चाखावा लागला. धुळेमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व असून जनता विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल न करता खोट्या वल्गना करु नये. जनतेमुळे तालुक्यात व जिल्हयात होणार्‍या प्रत्येक निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचा विश्‍वास आ.कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. बोरविहीर जि.प.सदस्य अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले. संभाजी राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रत्येक गावातील सोसायट्यांचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच धुळे जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सभापती बाजीराव पाटील, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव पाटील, मुख्य प्रशासक रितेश पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कें.डी.पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button