

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : पीएमआरडीएच्या वतीने मुळशी तालुक्यातील ग्रामस्थांच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. ही कारवार्ई स्थानिकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईला विरोध करणे आवश्यक आहे, असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
कासारसाई येथील विविध विकासकामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी आमदार थोपटे बोलत होते. कार्यक्रमात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, गटविकास अधिकारी संदीप जठार, सभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, की मुळशीतील घोटावडे येथे व्यावसायिक गाळे असलेल्या शेतकर्यांवर मोठी कारवाई पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आली. अलीकडच्या काळात अशी कारवाई वारंवार होत आहे.
शेतकर्यांना आपली बाजू मांडण्याची संधीदेखील देण्यात येत नाही ही निंदनीय बाब आहे. प्रामुख्याने कारवाई शेतकर्यांवर केली जाते. मुळशीतच अशा प्रकारे कारवाई होत आहे. इतर तालुक्यात मात्र कारवाई होत नाही हा भेदभाव का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कासारसाई येथे अतिशय सुंदर व देखण्या ग्रामपंचायत सचिवालयाची उभारणी करण्यात आली आहे. यात सभागृह, ग्रंथालय, बैठक व्यवस्थादेखील प्रशस्त करण्यात आली आहे.
काही लाखांतच उत्पन्न असलेल्या या ग्रामपंचायतची अनेक कामे करण्यास प्राधान्य दिल्याचे आमदार थोपटे म्हणाले. प्रस्तावना माजी सरपंच ललित शिंदे यांनी केले तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माऊली केमसे यांनी आभार मानले.
https://youtu.be/xzUCzCdKjCQ