Stock market : आय.टी., बँका, वित्त क्षेत्रांना गुंतवणूकदारांची पसंती | पुढारी

Stock market : आय.टी., बँका, वित्त क्षेत्रांना गुंतवणूकदारांची पसंती

गेल्या काही दिवसांत शेअर बाजारातील (Stock market) चढउतार मोठ्या प्रमाणावर होते. काही कारणांमुळे इथे तेजी वाढली, तर काही कारणांमुळे शेअर्समध्ये घसरण दिसली. गेल्या गुरुवारी बाजार बंद होताना निर्देशांक 57 हजारांच्यावर स्थिरावला; तर निफ्टी 17,136 पर्यंत गेला. माहिती व तंत्रज्ञान, वित्त, बँका या क्षेत्रांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्यामुळे तेजीसाठी आणखी एक सबळ कारण मिळाले. मार्च 2022 तिमाही व पूर्ण आर्थिक वर्ष यांचे आकडे आता प्रसिद्ध होऊ लागतील. इन्फोसिस, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, विप्रो, एचसीएलटेक यांचे आकडे लक्षणीय असतील. पाच – सहा महिन्यांच्या कालावधीसाठी या शेअर्समधील गुंतवणूक सध्या योग्य ठरेल.

केंद्र सरकारतर्फे एलआयसीच्या बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्रीला वेग आला आहे. या समभागांमध्ये विदेशी गुंतवणूक 20 टक्क्यांपर्यंत येण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारतर्फे उचलली गेली. एलआयसीचे भाग भांडवल 632.49 कोटी रुपये असून, हे सर्व भांडवल 100 टक्के केंद्र सरकारकडे आहे. त्यापैकी 5 टक्के भांडवल केंद्र सरकार विकण्याची शक्यता आहे. यापैकी 31.60 कोटी समभाग विक्रीला काढले जातील. त्यातून सरकारकडे मोठ्या प्रमाणावर रक्‍कम जमा होईल. यावर्षी सरकारचे निर्गुंतवणुकीचे 63 हजार कोटी रुपयांचे लक्ष आहे. त्यातील बहुतांश रक्‍कम एलआयसीच्या प्राथमिक समभाग विक्रीतूनच जमा व्हावी. हा आयपीओ ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून सादर केला जाईल. काही समभाग एलआयसीचे कर्मचारी व पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवले जातील.

बाजारात जसजशी तेजी दिसत आहे. त्याचा फायदा विदेशी गुंतवणूकदार सतत घेत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी 4518 कोटी रुपयांचे समभाग विकले. एका बाजूने अशी समभाग विक्री चालू ठेवताना दुसर्‍या बाजूने तीच रक्‍कम विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदीसाठी वापरली आहे. अशी खरेदी 1 एप्रिल ते 8 एप्रिल या आठवड्यात 7707 कोटी रुपयांची झाली.

भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे इथले बहुतांश दूध म्हशींचे असते. भारतात दरवर्षी साडेआठ लाख कोटी रुपये किमतीचे दूध उत्पादन होते. गहू व तांदळाच्या उत्पादनापेक्षा दुधाचे हे उत्पादन जास्त आहे.

“पिठात पाणी घालून केले दूध बळे निष्ठुर काळे।
पिता ती गरिबांची बाळे॥” अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. दुग्ध क्षेत्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष आहे. मोदींच्या काळात उत्पादकांच्या खिशात 1 रुपयाऐवजी फक्‍त 15 पैसेच पडायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता संपूर्ण 100 पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होतात.

खाद्य पदार्थांच्या वाढलेल्या किमती, इंधन व विजेच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सलग बाराव्या महिन्यात घाऊक महागाई दोन अंकी पातळीवर स्थिरावली आहे. घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित (Wholesale Price Index) महागाईचा (C.P.I) उच्चांकी पातळीवर गेली आहे. परिणामी सरकारी कर्मचारी संघटना व अन्य विविध संघटनांकडून महागाईभत्ता वाढवून देण्याची मागणी आता जोर धरीत आहे. महागाई भत्ते जर वाढवले गेले, तर महागाईचे दुष्टचक्र चालूच राहील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला खिंडार पडून भांडवली गुंतवणूक कमी होत जाईल.

मालाच्या जलद आणि दर्जेदार उत्पादनासाठी नवीन कल्पना आणि उत्पादनांची आवश्यकता आहे. गरज संपल्यानंतर पुरवठा झालास, तो किंमतशून्य ठरतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर व त्वरित पुरवठा होणे जरूरीचे असते. गेल्या काही वर्षांत गिअर्स, मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन, ग्रायडिंग टेक्नॉलॉजी आणि सरफेस फिनिशिंग प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे पुरवठाही जर वाढला, तर अर्थव्यवस्था गतिमान होेते व रोजगारही वाढतो. रोजगार वाढला की देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross Domestic Production) वाढते.

देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये (Stock market) गुरुवारी 22 एप्रिलला सलग दुसर्‍या दिवशी तेजीचे वातावरण दिसून आले. या सकारात्मक संकेतांमुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. यात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’, ‘इन्फोसिस’ आणि ‘एचडीएफसी’ यांच्या समभागांची कामगिरी सरस ठरली. या तेजीमुळे बाजारमूल्य 6 लाख कोटी रुपयांनी वाढले. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आता 2800 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

Back to top button