सातारा : मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मुलगा ठार | पुढारी

सातारा : मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मुलगा ठार

शेंद्रे : पुढारी वृत्तसेवा

शिवाजीनगर (ता. सातारा) येथे शिलनाथाच्या डोंगरावर यात्रेसाठी मंदिरात जाणार्‍या भाविकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे भीतीने पळापळ सुरू झाली. वाट मिळेल तिकडे भाविक सैरावैरा धावू लागले. त्यामध्ये एका शाळकरी मुलाचा दरीत पडून मृत्यू झाला. मधमाश्यांच्या हल्ल्यात दहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमेश्वर विलास कदम (वय 16) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. जखमींमध्ये अतुल लवंगारे, शुभम धनवडे, गणेश बाकले, शुभम साळुंखे, तन्मय लवंगारे, प्रताप धनवडे, संदेश धनवडे, प्रणय धनवडे, ऋतुजा धनवडे, राजेश पवार यांचा समावेश आहे. हे सर्वजण 25 ते 30 वयोगटातील आहेत.

शिवाजीनगर गावची यात्रा रविवारपासून सुरु झाली होती. गावच्या पश्चिम बाजूस असणार्‍या शिलनाथाच्या डोंगरावर शिलनाथाचे मंदिर आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी देवास नैवेद्य घेवून गावातील तरूण मुले, मुली, महिला, ग्रामस्थ व भाविक दर्शनासाठी निघाले होते. 100 ते 150 जण डोंगर चढत होते.काहीजण चढून गेले होते. अशातच आग्या मधमाशांनी अचानक हल्ला केला. पोळाजवळ असणार्‍या 12 जणांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. त्यातील सोमेश्वर कदम हा कढा चढून गेला होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ला केल्याने तो सैरावैरा पळू लागला, किंचाळू लागला. पळतापळता सोमेश्वर कड्यावरून खाली कोसळला. त्यामुळे गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला.

डोंगराच्या खालच्या बाजूला जे भाविक होते. ते गावाच्या बाजूने पळत सुटले. जे डोंगरावर पोहचले होते ते वरच कड्यावर पळत सुटले. तेथील वातावरण भयावह, गंभीर होते. गंभीर जखमी झालेल्यांच्या बचावासाठी ग्रामस्थ व शिवेंद्रराजे रेस्क्यू टिम दाखल झाली. त्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. त्यांनी सोमेश्वरचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. सर्व जखमींना सातार्‍यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अतुल लवंगारे, शुभम धनवडे, गणेश बाकले, शुभम साळुंखे, तन्मय लवंगारे, प्रताप धनवडे, संदेश धनवडे, प्रणय धनवडे, ऋतुजा धनवडे, राजेश पवार या जखमींवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

Back to top button