नाशिक : आर्मी स्कूलसाठी सिटी लिंक बस सुरू; विद्यार्थी-पालकांकडून आनंद व्यक्त | पुढारी

नाशिक : आर्मी स्कूलसाठी सिटी लिंक बस सुरू; विद्यार्थी-पालकांकडून आनंद व्यक्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पाठपुराव्यानंतर सिडकोतील पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांच्या हिताच्या दृष्टीने पाथर्डीफाटा ते आर्मी पब्लिक स्कूल देवळाली कॅम्प अशी सिटीलिंक बससेवा सोमवारपासून (दि.18) सुरू झाली. त्यावेळी जल्लोष केला. पालक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

पाथर्डी फाटा परिसरात आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून त्यांची मुले देवळाली कॅम्प येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. त्यांच्यासाठी थेट बससेवा नसल्याने त्यांना दोन-तीन बसेस बदलाव्या लागत आणि नाहक आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. त्यामुळे पाथर्डीफाटा ते आर्मी पब्लिक स्कूल (देवळाली कॅम्प) अशी सिटीलिंक बससेवा सुरू करून फेर्‍याही वाढविण्याची मागणी आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांच्या सह्यांचे निवेदन सुधाकर बडगुजर यांना प्राप्त झाले. त्यांनी महापालिका आयुक्त रमेश पवार यांची भेट घेत विद्यार्थ्यांची व्यथा मांडली. आयुक्तांनीही तातडीने दखल घेतली.

आर्मी पब्लिक स्कूलला जाण्यासाठी सिटीलिंक बस पाथर्डी फाटा येथे आली तेव्हा या बसला फुलांनी सजविण्यात आले होते. मनपा आयुक्त पवार, शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणला. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात स्कूलच्या दिशेने रवाना झाली. उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिरसाट, बंडू दळवी, नीलेश साळुंखे, श्रुती नाईक, भारती पवार, संध्या धुमाळ, संदीप तोरवणे, रमेश बच्छाव, विजय सूर्यवंशी, पंकज पाटील, विनोद महाजन, रुपेश महाजन, आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
हेही वाचा:

Back to top button