चंद्रावर दिसल्या काचेच्या गोट्या! | पुढारी

चंद्रावर दिसल्या काचेच्या गोट्या!

बीजिंग ः चांद्रभूमीवर चीनच्या ‘युतू-2’ रोव्हरने एक विचित्र शोध लावला आहे. या रोव्हरने अशा वस्तू शोधल्या आहेत ज्या दूरवरून पाहिल्यावर एखाद्या काचेच्या गोटीसारख्या किंवा चेंडूसारख्या दिसतात. चंद्राच्या धुळीने माखलेल्या जमिनीवर चकाकत असताना या वस्तू दिसून आल्या. युतू रोव्हरपासून या वस्तू काही शे मीटर अंतरावर आहेत.

हे रोव्हर या वस्तूंच्या जवळ गेल्यावरच त्या नेमक्या काय आहेत हे समजू शकेल. यापूर्वीही यूतू-2 रोव्हरने चंद्रावर झोपडी किंवा कपाटासारखी दिसणारी वस्तू शोधली होती. त्याच्या जवळ गेल्यावर समजले की हा तशा आकाराचा एक दगड आहे. आता यूतू-2 रोव्हरने शोधलेल्या या काचेच्या गोट्यांबाबतची माहिती ‘सायन्स बुलेटिन’ नावाच्या नियतकालिकात देण्यात आली आहे. हे गोळे पंधरा ते 25 मिलीमीटरचे असावेत असा अंदाज आहे.

यूतू-2 रोव्हरने त्यांची दोन छायाचित्रे टिपली आहेत. तसेच त्यांच्यासारख्या दिसणार्‍या चार अन्य वस्तूंचाही छडा लावला आहे. मात्र, या छायाचित्रांवरून या वस्तू काय आहेत हे संशोधकांना समजलेले नाही. पुढील काही दिवसांमध्ये हे रोव्हर त्या वस्तूंजवळ गेल्यावरच त्यांची सत्यता समजेल. वैज्ञानिकांचे अनुमान आहे की एखादी उल्का चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्यानंतर काही उष्ण पृष्ठभागाचे रूपांतर काचेत झालेले असू शकते.

चंद्रावर प्राचीन काळातील सक्रिय ज्वालामुखीमुळेही काचेची निर्मिती झालेली असू शकते. ज्वालामुखीतून सिलिकेट द्रवरूपात बाहेर आलेला असावा आणि तो गडगडत गेल्याने गोल बनलेला असावा. थंड झाल्यावर त्याचे रूपांतर काचेच्या गोळ्यात झाले असावे, असेही संशोधकांना वाटते.

हेही वाचलंत का? 

Back to top button