रुपी बँकेच्या ठेवीदारांना मिळाले 700 कोटी रुपये | पुढारी

रुपी बँकेच्या ठेवीदारांना मिळाले 700 कोटी रुपये

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : रुपी सहकारी बँकेतील 64 हजार खातेदारांना महिनाभरात सातशे कोटी रुपये परत मिळाले. ठेव विमा महामंडळाने ही रक्कम दिली. रिझर्व्ह बँकेने नऊ वर्षांपूर्वी ‘रुपी’वर आर्थिक निर्बंध लागू केल्यानंतर या ठेवीदारांना आता दिलासा मिळाला आहे.

रुपीच्या सर्वाधिक 14 शाखा पुणे शहरात आहेत. ठाण्यात सहा, पिंपरी-चिंचवडमध्ये पाच, मुंबईत तीन, तर कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथे प्रत्येकी एक शाखा आहे. रुपीवर 2002 मध्ये पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेने कारवाई केली, तेव्हा ती राज्यातील सहकार क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकावरील बँक होती. रुपीवर फेब्रुवारी 2013 मध्ये पुन्हा आर्थिक निर्बंध घालण्यात आले. ते अद्यापही कायम असल्याने, ठेवीदारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागले होते.

मोठा दिलासा : कोरोनाची चौथी लाट येण्‍याची शक्‍यता नाही : वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ प्रो. मनींद्र अग्रवाल यांचा दावा

५ लाखांपर्यंत वीमा संरक्षण मिळाल्याने खातेदारांचा फायदा

एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना पूर्वी विमा संरक्षण होते. गेल्या वर्षी मुंबईतील काही सहकारी बँका आर्थिक अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांनी जोरदार आंदोलने केली. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्याच वर्षी विमा संरक्षणाची रक्कम एक लाखावरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविली. त्याचा फायदा रुपीसह अडचणीतील अन्य सहकारी बँकांतील खातेदारांना झाला.

केंद्राकडून सुरक्षा पुरविणं हे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण : दिलीप वळसे-पाटील

रुपीमधील चार लाख 85 हजार 867 ठेवीदारांची पाच लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम बँकेत होती. ती एकूण रक्कम गेल्या वर्षी 720 कोटी रुपये होती. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रुपी सहकारी बँकेतील 99 टक्के खातेदारांची रक्कम विमा संरक्षणाखाली सुरक्षित झाली. रुपीमधील 4,504 खातेदारांची पाच लाख रुपयांपेक्षा अधिक ठेव असून, ती एकूण रक्कम 574 कोटी एवढी आहे.

राजकीय दंगलींमुळे भारताचा श्रीलंका होण्‍यास वेळ लागणार नाही : संजय राऊत

१५ मार्चपासून रक्कम वाटपास सुरुवात

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ठेव विमा महामंडळाने विमा संरक्षणाची रक्कम नव्वद दिवसांत देण्याचा कायदा केला. त्याची अंमलबजावणी करताना रुपीतील ठेवीदारांना रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या सप्टेंबरमध्ये खातेदारांना अर्ज करण्यास सांगण्यात आले. मात्र, रुपीचे अन्य सक्षम बँकेत विलीनीकरण करण्याचाही मुद्दा होता. त्यामुळे रक्कम देण्याचा निर्णय तीन महिने पुढे ढकलण्यात आला होता. ती मुदत संपल्यानंतर महामंडळाने 26 फेब्रुवारी रोजी सातशे कोटी रुपये पाठविले. बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 15 मार्चपासून हळूहळू खातेदारांची शहानिशा करीत ती रक्कम संबंधितांच्या विविध बँकांतील खात्यांवर पाठविण्यात आली.

भाजपाची सांप्रदायिकता आणि इंधन दरवाढीविरोधात देशात जागृती करणार : शरद पवार

शताब्दी पूर्ण केलेल्या रुपी बँकेचे अनेक खातेदार विशेषतः निवृत्तिवेतनधारक हे गेली नऊ वर्षे रक्कम मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत आले होते. आजारपण अथवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी अनेकांना हार्डशिपखाली रक्कम देण्यात आली. या पद्धतीने चारशे कोटी रुपये गेल्या पाच वर्षांत खातेदारांना देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने एकूण अकराशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. बँकेने अनुत्पादित कर्जापैकी (एनपीए) 290 कोटी रुपये गेल्या वर्षीपर्यंत वसूल केले.

 तासगाव : राज ठाकरे फडणवीसांच्या हातातील बोलका बाहुला- राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख 

विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरूच

रुपी बँकेकडील ठेवी व मालमत्ता नऊशे कोटी रुपयांच्या आहेत. बँक अवसायनात निघाल्यास ठेव विमा महामंडळ बँकेला दिलेले सातशे कोटी रुपये या नऊशे कोटी रुपयांतून काढून घेईल. सध्या बँक अन्य सक्षम बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यास नवीन बँकेकडे रुपीचा कारभार जाईल.

रुपी बँकेत 64 हजार ठेवीदारांची सव्वा लाख खाती होती. त्या सर्वांनी नियमानुसार अर्ज केल्यानंतर त्यांना रक्कम देण्यात आली. काही कारणामुळे ज्यांची रक्कम मिळालेली नाही, त्यांनाही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच रक्कम दिली जाईल. सातशे कोटी रुपये वाटण्यात आले. आणखी अर्ज आल्यास ते महामंडळाकडे पाठविण्यात येतील.

                                                – नितीन लोखंडे, सरव्यवस्थापक, रुपी सहकारी बँक.

रुपी बँकेची स्थिती
  • एकूण ठेवी – 1300 कोटी रुपये
  • विमा महामंडळाकडून मिळालेली रक्कम – 700 कोटी रुपये
  • द्यावयाची रक्कम – 600 कोटी रुपये
  • रुपीकडील शिल्लक ठेवी व
  • मालमत्ता – 900 कोटी रुपये

Back to top button