सप्तशृंगी देवी पावली ; एसटीच्या तिजोरीत कोटीची भर, चैत्रोत्सवामुळे उत्पन्न वाढले | पुढारी

सप्तशृंगी देवी पावली ; एसटीच्या तिजोरीत कोटीची भर, चैत्रोत्सवामुळे उत्पन्न वाढले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी चैत्रोत्सवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंहळाच्या लालपरीला पसंती दिली. चैत्रोत्सवात प्रवासी वाहतूक सेवेमुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल एक कोटीची भर पडली. सप्तशृंगी देवी पावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनंतर यंदा सप्तशृंगगडावर दि. 10 ते 16 एप्रिल या कालावधीत चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नांदुरी पायथा ते सप्तशृंगगड या 11 किमीच्या घाटरस्त्यावरील प्रवास वाहतूक सेवा केवळ एसटी महामंडळाकडे सोपविण्यात आली होती, तर खासगी वाहनांची वाहतूक ही विशेष अधिसूचनेद्वारे बंद करण्यात आली होती.

गडावर जाणार्‍या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी 250 बसेस एसटी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. गेल्या साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्रोत्सवात प्रवासी वाहतूक करण्याचे आव्हान नाशिक विभागासमोर होते. एसटी महामंडळाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी अहमदनगर, ठाणे आणि पालघर विभागांकडून जादा बसेस व कर्मचार्‍यांची मागणी करण्यात आली होती. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडीचा कडाका या विषम परिस्थितीत तसेच या घाट रस्त्याची पुरेशी माहिती नसूनदेखील या तिन्ही विभागांच्या चालक-वाहकांनी अतिशय सुरक्षित सेवा पुरविली.

दरम्यान, संपूर्ण चैत्रोत्सवात नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी एसटी बसला परवानगी असल्याने भाविकांनी लालपरीला प्राधान्य दिल्याचे चित्र होते. कोरोनानंतर प्रथमच एखाद्या यात्रेसाठी तब्बल सव्वातीन लाख प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. यात्रोत्सवात कुठेही दुर्घटना न घडल्याने एसटी प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

असे मिळाले उत्पन्न…

नाशिक विभाग : 65 लाख, नगरविभाग : 30 लाख, पालघर विभाग : 6.25 लाख, ठाणे विभाग : 08 लाख

हेही वाचा :

Back to top button