सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी

सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा ; अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणून सप्तशृंगगडावर येत्या रविवार (दि.10) पासून सुरू होणार्‍या चैत्रोत्सवासाठी व्यापार्‍यांची लगबग सुरू झाली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. यावेळी यात्रोत्सवात सर्व विभागाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याची सूचना पाटोळे यांनी केली.

दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमावरील निर्बंध शिथिल केल्याने गडावरील पांरपरिक पद्धतीने चैत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. याबाबत सोमवारी (दि. 4) झालेल्या नियोजन बैठकीत निर्णय घेण्यात आला. भाविकांना दर्शनासाठी बॅरिकेड्समधून सोडण्यात येणार आहे. मंदिर परिसरासह विविध ठिकाणी 256 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रवेशद्वाराजवळ नियोजन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. वनविभाग हद्दीत बाहेरून आलेल्या व्यापार्‍यांना बंदी करण्यात आली असून, त्याकरिता इतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड या 10 कि.मी. अंतरावरील घाटात भाविकांना ये-जा करणे सुलभ व्हावे, याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

तसेच नांदुरी येथे मेळा बसस्थानकाची स्थापना करण्यात आली असून, गडावरही बसस्थानकाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादा बसेसचेही नियोजन केले आहे. वन विभाग, अन्न प्रशासन विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, देवी संस्थान आदींचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थितीत होते. बैठकीत तहसीलदार बंडू कापसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल तांबे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, ग्रामपंचायत सप्तशृंगगड, नांदुरीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, देवी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला विश्वस्तांची अनुपस्थिती…
चैत्रोत्सवात देवी संस्थान महत्त्वाची भूमिका निभावत असते. भाविकांच्या सेवेसाठी देवी संस्थानवर विश्वस्त नियुक्त केले जातात. या महत्त्वाच्या सोहळा नियोजनासाठी अपर जिल्हाधिकारी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. पण, या बैठकीला विश्वस्तच उपस्थित नव्हते. त्यामुळे देवी संस्थानचे विश्वस्त चैत्रोत्सव किती गांभीर्याने घेतात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news