ईडी अधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप; तपासासाठी एसआयटी स्थापन, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती | पुढारी

ईडी अधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप; तपासासाठी एसआयटी स्थापन, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ईडी अधिकाऱ्यांच्या आरोपांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांकडून एसआयटी तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. हे एसआयटी तपास पथक अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांची मुंबईमधील कार्यालये खंडणीखोर बनली आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी याआधी केली होती. महाराष्ट्राला कशाप्रकारे लुटले आहे, हे सगळे उघड करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. आता या प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे.

दरम्यान, भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले आहे. मराठी नववर्षानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करीत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

Back to top button