नाशिक : सिव्हिल शवागाराचे रुपडे पालटणार | पुढारी

नाशिक : सिव्हिल शवागाराचे रुपडे पालटणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीची शवागाराची व्यवस्था आहे. मात्र, त्यात नेहमीच समस्या येत असल्याने त्या बहुतांश नादुरुस्त आहेत. त्यामुळे बेवारस मृतदेहांची दुर्गंधी व पाणी शवागारात व परिसरात पसरते. त्यावर पर्याय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासनाकडे नव्या शवागाराचा प्रस्ताव पाठवला असून, त्यासाठी 52 लाख रुपयांची मागणी केली आहे. या खुल्या शवागारात मोठ्या खोलीत मृतदेह ठेवण्यात येतील व त्या खोलीचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित राहू शकते.

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृह व शवागार उभारण्यात आले आहे. शवागारात 54 शवपेट्या आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या पेट्या अनेकदा नादुरुस्त असतात. वारंवार पाठपुरावा करूनही तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने हा प्रश्न कायमच भेडसावत असतो. नादुरुस्त पेट्यांमुळे बेवारस मृतदेहांची दुर्गंधी व पाणी शवागारासह परिसरात पसरत असते. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची भीती असते. दरम्यान, यावर तोडगा म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाने नव्याने शवागार उभारण्याचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे. त्यानुसार एका मोठ्या खोलीचे तापमान नियंत्रित करून मृतदेह त्या ठिकाणी स्ट्रेचरवर ठेवण्यात येतील. जेणेकरून त्यांचे जतनही योग्यरीत्या होण्यास मदत होऊ शकते. शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शवागाराच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे शवविच्छेदन गृहातील ओट्यांची संख्या तीनहून 10पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

बेवारस मृतदेहांचा प्रश्न गंभीर…
जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात दरमहा सुमारे 15 हून अधिक बेवारस मृतदेह येत असतात. त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांचा तपास व अहवाल महत्त्वाचा असतो. मात्र, त्यात अनेकदा विलंब होत असल्याने अनेक मृतदेह शवागारातच पडून आहेत.

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शवागारातील 54 पेट्या बंद पडल्याचे सूत्रांनी सांगितले. काही शवपेट्यांचे कॉम्प्रेसर बंद पडले आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान स्थिर राहात नाही. दरवाजे नादुरुस्त आहेत.

हेही वाचा :

Back to top button