

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या विविध कार्यक्रमांना पोलिस परवानगी मिळत नसल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र पोलिस आयुक्त व समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाल्यानंतर पोलीस परवानगीसह नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित महावादन, महारांगोळी, अंतर्नाद या कार्यक्रमांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
पोलीस परवानगीसाठी अडवणूक करत असल्याचा आरोप करीत समितीच्या पदाधिका-यांनी कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा केली होती. पोलीस अधिकारी 6 तास कार्यालयाबाहेर बसवून परवानगी नाकारतात असा आरोप पदाधिकार्यांनी केला होता, तर पदाधिकारी दिलेल्या वेळेत भेटण्यासाठी आले नसल्याने परवानगीवर निर्णय झाला नसल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले होते.
या आरोप प्रत्यारोपांमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करीत पोलीस आयुक्तांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी समितीच्या पदाधिकऱ्यांना भेटीसाठी बोलवले. त्यात नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत, मधल्या काळात झालेले सर्व समज – गैरसमज दूर झाल्याचा दावा पदाधिकार्यांनी केला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांमार्फत स्वागत समितीला सर्व कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली.
समिती मार्फत आधीच सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे स्वागत यात्रा वगळता इतर कार्यक्रमांसाठी वेळ नसल्याने, नववर्ष स्वागत समितीतर्फे पोलीस आयुक्तांकडे रद्द झालेल्या कार्यक्रमांसाठी पुन्हा एकदा नवीन तारखांसह हे सर्व कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली. त्यास पोलिसांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शहरातील प्रमुख चौकात व प्रमुख मंदिरांमध्ये गुढी उभारून त्याचे पूजन होणार आहे. शुक्रवार १५ एप्रिल रोजी अंतर्नाद , शनिवार १६ एप्रिल रोजी महावादन आणि रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी महारांगोळी असे कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत, गोदाघाटावरील पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण) याठिकाणी होणार असल्याचे नववर्ष स्वागत समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.