वाई : पसरणी घाटात वणव्याने डोंगर जळून खाक | पुढारी

वाई : पसरणी घाटात वणव्याने डोंगर जळून खाक

वाई; पुढारी वृत्तसेवा : पसरणी घाटात बुधवारी लागलेल्या वणव्याने संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून हा वणवा दुसर्‍या दिवशी आटोक्यात आला.

दि. 30 रोजी सायंकाळी पसरणी घाटातील गणपती मंदिरापासून वणवा लागला होता, तो गुरुवार दि. 31 रोजी सायंकाळी 7 वा. आटोक्यात आला. सह्याद्री अ‍ॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दिर्घ काळ सुरु असलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण 13 किलोमीटरचा डोंगर जळून खाक झाला.

विशेष म्हणजे एवढा मोठा वणवा लागूनही वनविभागाचा एकही कर्मचारी तिकडे फिरकला नाही. सह्याद्री अ‍ॅकॅडमीच्या सदस्यांनी काही नागरिकांच्या मदतीने संपूर्ण रात्रभर वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. हा वणवा आटोक्यात आणताना हे सर्वजण अक्षरश: दमून गेले. या वणव्यात 13 किलोमीटर परिघातील पसरणी घाटातील वनसंपदा जळून खाक झाली. अ‍ॅकॅडमीच्या प्रशांत डोंगरे, राजेंद्र खरात व सहकार्‍यांनी वणवा आटोक्यात आणला.

यशवंत मन्ने, केदार धुमाळ, अनुकूल सरवदे, अभिजित पवार,प्रतिक जाधव, अभिजित जाधव,शुभम जाधव, मंगेश पडळकर, आशुतोष शिंदे,सागर पवार, हिंदुराव सुळके, किरण पाटील, राजेंद्र खरात यांनीही वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Back to top button