चित्रा वाघ यांचा भाजप नेते धनंजय महाडिकांना घरचा आहेर | पुढारी

चित्रा वाघ यांचा भाजप नेते धनंजय महाडिकांना घरचा आहेर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या महिलाविषयक वक्तव्याची दखल घेत भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. वाघ यांनी ट्विट करून मातृशक्तीचा अपमान होईल असे वक्तव्य कोणी करू नये, असे आवाहन केले आहे.

धनंजय महाडिक यांनी प्लंबरची बायको प्लंबर होईल का इलेक्ट्रिशियनची बायको इलेक्ट्रिशियन बनेल का, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याला विविध थरातून विरोध होत आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनीही ट्विट करून राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढविला, राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडविले, महाराणी ताराराणी यांनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेबला रडविला. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडविला. महिलांचा सन्मान व्हायलाच हवा, असे म्हटले आहे.

चित्रा वाघ : महाडिक यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांची निदर्शने

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी पुतळ्यासमोर गुरुवारी निदर्शने केली. महाडिक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही यावेळी दिल्या.

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ महाडिक यांचे एका प्रचार सभेतील महिलांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये महाडिक यांनी महिलांचा अनादर करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसच्या शहर अध्यक्षा संध्या घोटणे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, माधुरी लाड, शोभा कवाळे, वृषाली कदम, जयश्री चव्हाण, दीपाली मगदूम आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Koo App

राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला.. जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला.. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला… इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडवला.. महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा.. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत .. #bjpindia #bjpmaharashtra #bjpkolhapur #BjpMumbai

Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 31 Mar 2022

Back to top button