नाशिक : जिल्हा बँकेची केवळ इतकीच कर्जवसुली ; पीककर्ज वाटपावर परिणामाची शक्यता | पुढारी

नाशिक : जिल्हा बँकेची केवळ इतकीच कर्जवसुली ; पीककर्ज वाटपावर परिणामाची शक्यता

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभर राबवलेल्या कर्जवसुली मोहिमेतून केवळ साडेसहा टक्के वसुली झाली आहे. या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेची एकूण वसुलीपात्र थकबाकी 2180 कोटी रुपये असून, त्यापैकी केवळ 171 कोटी वसुली करण्यात प्रशासकांना यश आले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा बँकेने 467 कोटी रुपये पीककर्ज दिले होते. त्यापैकी केवळ 50 कोटींची वसुली झाली आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात जिल्हा बँकेच्या पीककर्ज वाटपावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 2015-16 या आर्थिक वर्षापर्यंत चांगली वसुली व्हायची तसेच कर्जवाटपही मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र, 2017 मध्ये अनेक शेतकरी संघटनांनी राज्य सरकारने कर्जमाफी मिळावी, यासाठी मागणीचा जोर धरला. त्यामुळे कर्जमाफी होणार या आशेने त्यावर्षी शेतकर्‍यांनी पीककर्जाच्या परतफेडीकडे दुर्लक्ष केले. नेमके त्याचवर्षी जिल्हा बँकेने विक्रमी 1791 कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले असताना प्रत्यक्षात वसुली केवळ 9 टक्के झाली. तेव्हापासून जिल्हा बँकेला घरघर लागली आहे.

त्यानंतर 2017 व 2019 मध्ये घोषित झालेल्या कर्जमाफी योजनांमुळे जिल्हा बँकेची सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे कर्जवसुली चांगली झाली. यामुळे बँकेने कर्जवाटपही चांगले केले. जिल्हा बँकेने 2020-21 या आर्थिक वर्षात 483 कोटींचे कर्जवाटप केले होते व कर्जवसुली 32 टक्के झाली. मागील वर्षी जिल्हा बँकेने 53610 शेतकर्‍यांना 467 कोटी रुपये कर्जवाटप केले. मात्र, दि. 29 मार्चपर्यंत त्यापैकी केवळ 50 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. शेतकर्‍यांनी 31 मार्चपर्यंत पीककर्जाची परतफेड केल्यास त्या कर्जावर शून्य टक्के दराने व्याज आकारणी होते. यामुळे शेतकर्‍यांना 31 मार्चच्या आत कर्ज परतफेड करण्याचे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले आहे.

2020-21 मध्ये- 483 कोटी रुपयांचे कर्जवाटप-32 टक्के कर्जवसुली 

2021-22 मध्ये-467 कोटी रुपयांचे कर्जवाटप-6.5 टक्के कर्जवसुली

प्रोत्साहन योजनेवर परिणाम
राज्य सरकारने या आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. जिल्हा बँकेचे असे नियमित पीक कर्जफेड करणारे 12 हजार शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी नियमित कर्जफेड केल्यास त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळू शकते. त्यामुळे या नियमित कर्जदार शेतकर्‍यांनी मुदतीच्या आत कर्ज परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

 

Back to top button