रत्नागिरी: अणसुरे ग्रा.पं.कडून दुर्मीळ वनस्पतींचे जतन | पुढारी

रत्नागिरी: अणसुरे ग्रा.पं.कडून दुर्मीळ वनस्पतींचे जतन

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गंत गावातील विविधांगी दुर्मीळ वृक्षांची गणना करताना सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या पुरातन अन् दुर्मिळ वृक्षांना ‘हेरिट्रेज ट्री’चा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या विविधांगी शंभर वृक्षांचा समावेश आहे. वृक्षसंवर्धनाचा असा अनोखा उपक्रम राबविणारी अणसुरे ग्रामपंचायत बहुधा पहिली ठरली आहे.

सरपंच रामचंद्र कणेरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमामध्ये ‘हेरिट्रेज ट्री’ म्हणून नोंद आणि दर्जा दिलेल्या गावांतील या वृक्षांची सविस्तर माहितीची यादी ग्रामपंचायतीकडून वन विभागाकडे पाठविली आहे. या वृक्षांच्या तोडीस प्रतिबंध केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राऊत यांनी
दिली.

‘दर्यापीरापासून दुर्गादेवीपर्यंत’ असे सुमारे 6 किलोमीटर लांब पश्चिम-पूर्व पसरलेल्या अणसुरे गावामध्ये विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. त्यामध्ये अनेक पुरातन विविधांगी वृक्षांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने आंबा आणि काजूची लागवड केली आहे. त्यामध्ये काही जंगली झाडांची वृक्षतोड झाली. त्यामध्ये जुनाट झाडे धोक्यात आली आहेत. या स्थितीत शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी अणसुरे ग्रामपंचातीने पुढाकार घेतला आहे.

वृक्षसंवर्धन होताना पुरातन झाडांचा ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने या वृक्षांना हेरिटेज ट्रीचा दर्जा दिला आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. अशा स्थितीमध्ये अणसुरे ग्रामपंचायतीने राबविलेल्या वृक्षसंवर्धनाच्या उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

पुरातन वृक्षांची छायाचित्रे घेऊन नोंद

अणसुरे ग्रामपंचायतीच्या वतीने ‘हेरिटेज ट्री’ म्हणून दर्जा देण्यात आलेल्या वृक्षांमध्ये वड, पिंपळ, रायवळ आंबा, काटेसावर, उंबर, बेहडा, जांभूळ, सोनचाफा, कुसुम्ब, किंजळ, शिवण, हुरा, आष्टा, वारस, हरडा आदी शंभरापेक्षा अधिक जास्त वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांची लोकेशनसहीत छायाचित्रे घेऊन त्यांची नोंद करण्यात आली आहे.

हाही वाचा

Back to top button