नाना पटोलेंना धक्का, नागपूरचे प्रसिद्ध वकील सतीश उकेंना ईडीनं घेतलं ताब्यात | पुढारी

नाना पटोलेंना धक्का, नागपूरचे प्रसिद्ध वकील सतीश उकेंना ईडीनं घेतलं ताब्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

जमिनीच्या व्यवहारप्रकरणी ईडीने अॅड. सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सकाळपासून सतीश उके यांच्या नागपूरमधील घराची ईडीने झाडाझडती घेतली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. सतीश उके यांच्या घरावर ईडीने गुरुवारी सकाळी धाड टाकली. त्यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त आहे. ॲड. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवत आहेत. एकंदरीत उके हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तसेच भाजपच्या विरोधात नेहमी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून बोलत असतात. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातही त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. उके यांची काँग्रेसच्या तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक आहे. नाना पटोले यांनी गावगुंड मोदींना मारण्याची भाषा केली होती. त्यावेळी त्यांची बाजूही उके यांनी उचलून धरली. गावगुंड मोदीला उके यांनी पत्रकार परिषदेत बोलायला लावले.

नुकतेच संजय राऊत हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उके यांनी संजय राऊतांची भेट घेतली. या सर्व प्रकरणांची दखल भाजपच्या नेत्यांनी घेतली. नाना पटोले यांनी गावगुंड मोदींना मारण्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा गावगुंड मोदी समोर आला. तो पत्रकार परिषद घेत होता. तेव्हा त्याच्यासोबत सतीश उके होते. नाना पटोलेंची बाजू सावरण्याचं काम सतीश उके करत होते. त्यामुळं काँग्रेसच्या जवळचा वकील अशी प्रतिमा सतीश उके यांनी आहे.

वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती.

देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका

देवेंद्र फडणवीस यांच्यावर २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

हे ही वाचा 

 

Back to top button