नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात उष्णतेची लाट जरी असली तरी सर्वत्र मात्र भगवी लाट दिसत असल्याचे सांगत जिल्ह्यातून एक लाख सदस्य करण्याचे आवाहन युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
सिडकोतील माउली लॉन्स येथे युवासेनेच्या वतीने आयोजित मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आ. सुहास कांदे, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंभळे, प्रथमेश गिते, शंभु बागूल, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, शीतल देवरुखकर, राहुल ताजनपुरे, समीर बोडके, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, समीर बोडके, हर्षदा गायकर उपस्थित होते.
सरदेसाई म्हणाले की, 2014 तसेच 2019 मध्ये भारतामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल, देशात विकासाची गंगा येईल या आशेने नागरिकांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु त्यांनी महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवली. बेरोजगारांची संख्या वाढवली. संपूर्ण देशाचा विकास खुंटला. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीला ईडी, सीबीआयच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. तरीसुद्धा संपूर्ण देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. तसेच 15 एप्रिलपासून राज्यात युवासेनेतर्फे सदस्य नोंदणी सुरू होत आहे. यात नाशिक जिल्ह्यातून एक लाख सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांनी प्रास्ताविक केले.