बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
जनवाड येथे नांगरताना ट्रॅक्टरमध्ये बसलेला मुलगा खाली पडून चाकाखाली सापडल्याने ठार झला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. स्वरूप ऊर्फ भैय्या शिवगोंडा सौंदलगे (वय 10) असे मृताचे नाव आहे. वाढदिनीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जनवाडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वरूप हा वडिलांसमवेत नांगरणीसाठी ट्रॅक्टरमधून गेला होता. वडील ट्रॅक्टरने नांगरत असताना तो बाजूला बसला होता. बांधावरून ट्रॅक्टर सखल भागात आल्यावर स्वरूपचा तोल जाऊन खाली पडला. तो चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून भयभीत झालेल्या त्याच्या वडिलाने आरडाओरडा करून हंबरडा फोडला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह नातेवाईक धावत आले. स्वरूप हा तिसरीमध्ये शिकत होता. त्याचा वाढदिवस असल्याने गावातील शाळेत मुलांना चॉकलेट, बिस्किटांचे वाटप करून सायंकाळी कुटुंबीयांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत स्वरूच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.