नाशिक : पोलिस आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध शनिवारी पेट्रोल पंप बंद | पुढारी

नाशिक : पोलिस आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध शनिवारी पेट्रोल पंप बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारास पेट्रोल न देण्याचे आदेश पेट्रोल पंपचालकांना दिले आहे. त्याचप्रमाणे यापुढे पेट्रोल दिल्यास संबंधित पेट्रोल पंपचालक-मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे या आदेशाविरोधात पेट्रोल पंप संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे आता पोलिस आयुक्त व पेट्रोल पंप संघटनेत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिस आयुक्त पाण्डे्य यांनी बुधवारी (दि.30) हेल्मेट सक्तीबाबत नवीन आदेश जाहिर केले. त्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्यास समुपेदशन व दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल देणार्‍या पेट्रोल पंपचालकांवरही गुन्हे दाखल करण्याचे पाण्डे्य यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनने याबाबत नाराजी वर्तवली असून त्यांनी शनिवारी संप पुकारला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष भुषण भोसले यांनी सांगितले की, पोलिस आयुक्तांच्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेस आमचा पाठिंबा आहे. मात्र पोलिसांनी घेतलेली भूमिका व पेट्रोल पंपचालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अतिशय धक्कादायक आहेत. हेल्मेट सक्तीमुळे दुचाकीचालक फक्त पेट्रोल पंपावर हेल्मेट घालत असल्याचे दिसते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यालयास सुनावणी घेण्यास सांगितले होते. असोसिएशनने वकिलामार्फत 19 नोव्हेंबर 2021 रोजी अर्ज केला आहे. मात्र पोलिस आयुक्तांकडून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चार महिन्यांनंतर बैठक घेत जुन्या अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. मात्र उच्च न्यायालयातील अर्ज आयुक्तालयाकडे प्रलंबित आहे.

आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत, मात्र त्याची अंमलबजावणी नाही करू शकत. पोलिस आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध आम्ही पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहोत. या निर्णयामुळे पंप चालकांना त्रास होणार असल्यामुळे नाशिक शहरातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी शनिवारी (दि.2) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा निषेध नोंदवणार आहोत. पालकमंत्री व पोलिस आयुक्तांकडून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी संघटनेला आशा आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार असोसिएशनच्या मागणी अर्जावर जोपर्यंत लेखी आदेश मिलत नाही तोपर्यंत हेल्मेट सक्ती मोहिमेस कोणतेही सहकार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत.
– भूषण एल. भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन.

हेही वाचा :

Back to top button