उष्णतेचा कहर; चंद्रपूर येथे तापमानाचा पारा 44.2 अंशांवर | पुढारी

उष्णतेचा कहर; चंद्रपूर येथे तापमानाचा पारा 44.2 अंशांवर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सर्वच भागांत उष्णतेची जोरदार लाट आली आहे. बुधवारी विदर्भातील चंद्रपूर येथे तापमानाचा पारा 44.2 अंशांवर पोहोचला आहे. दरम्यान, 2 एप्रिलपयर्ंत राज्यात उष्णतेची लाट सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.8 अंशापासून 4.4 अंशांवर पोहोचला आहे. उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात विशेषत: सौराष्ट्र, मध्य प्रदेश या भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे.

या भागातील उष्ण वारे राज्याकडे मध्य प्रदेशमार्गे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांत तीव्र उन्हामुळे कमाल तापमनात वाढ होऊन उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. राज्यात कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही सरासरीपेक्षा 3.6 अंशापर्यत वाढ झाली आहे.

नागपूर : उत्तरेकडून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. अंग भाजून काढणार्‍या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहे. बुधवारी चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तेथे कमाल 44.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

यापूर्वी 20 एप्रिल 2018 मध्ये 45.9 तर 18 एप्रिल 2018 मध्ये 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आणखी किमान तीन ते चार दिवस ही लाट कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होत जाईल, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

जळगावात उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी

जिल्हातील 27 वर्षीय शेतकर्‍याचा उष्माघाताने बुधवारी मृत्यू झाला, जितेंद्र संजय माळी असून अंमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यन त्यांचा मृत्यू झाला. या हंगामातील उष्माघाताने राज्यातील हा पहिलाच बळी ठरला आहे. माळी शेतातील काम संपल्यानंतर घरी परतत असताना त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना अन्य शेतकर्‍यांनी रूग्णालयात दाखल केले.

Back to top button