मिरज : एरंडोलीत दोन गटात सशस्त्र राडा | पुढारी

मिरज : एरंडोलीत दोन गटात सशस्त्र राडा

मिरज : पुढारी वृत्तसेवा

एरंडोली (ता. मिरज) येथे द्राक्षे घेऊन त्याचे पैसे न दिल्याच्या कारणातून दोन गटात तुफान राडा झाला. मारामारीत चाकूंचा वापर करण्यात आला असल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रदीप रामचंद्र सूर्यवंशी आणि शरद शिवाजी पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी प्रदीप सूर्यवंशी यांनी शरद शिवाजी पाटील आणि भरत शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध तर शरद शिवाजी पाटील यांनी प्रदीप रामचंद्र सूर्यवंशी आणि तुकाराम नामदेव रोडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

प्रदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरद पाटील याने वडील रामचंद्र सूर्यवंशी यांच्याकडून पाहुण्यांना देण्यासाठी दोन कॅरेट द्राक्षे नेली होती. प्रदीप हे घरी आल्यानंतर शरद याने पैसे न देताच द्राक्षे नेल्याचे समजले. त्यावेळी शरद याने “द्राक्षेही देत नाही, आणि पैसेही देत नाही”, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच द्राक्षे पाहिजे असल्यास दि. 28 मार्चरोजी रात्री 9 वाजता महेश शिंदे याच्या बेदाणा शेडवर येण्यास सांगितले. प्रदीप सूर्यवंशी हे त्या ठिकाणी गेले असता शरद आणि भरत या दोघांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.

शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे प्रदीप सूर्यवंशी याच्यासोबत द्राक्षे देण्याचे ठरले होते. तसेच शरद पाटील हे काशिनाथ शिंदे यांच्या शेडवर द्राक्षे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रदीप आणि तुकाराम हे दोघे त्या ठिकाणी गेले. त्यांच्यात वादावादी झाली. या वादातून प्रदीप हा चाकू घेऊन शरद याच्या अंगावर धावून जात असताना त्यांचा भाऊ भरत हा मध्ये आल्याने त्याच्यावर चाकूहल्ला झाला. त्यामध्ये त्याला दुखापत झाली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button