IPL 2022 : RCB vs KKR; आरसीबीचा संघर्षपूर्ण विजय | पुढारी

IPL 2022 : RCB vs KKR; आरसीबीचा संघर्षपूर्ण विजय

मुंबई : वृत्तसंस्था

शाहबाज अहमद आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी केलेल्या खणखणीत खेळ्यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या विजयाची न्यारी चव चाखली. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा हा सामना 3 गडी राखून जिंकला आणि विजयाचे दोन गुण वसूल केले. त्यांनी 132 धावा केल्या.

विजयासाठी 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगलोर संघाची सुरुवातदेखील धक्कादायक झाली. फलकावर फक्त 1 धाव लागलेली असताना त्यांचा सलामीवीर अनुज रावत भोपळाही न फोडता तंबूत परतला. नंतर कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस हाही फार काळ तग धरू शकला नाही. 5 धावा केल्यानंतर तो बाद झाला. पाठोपाठ दोन चौकारांसह 12 धावा करून विराट कोहलीनेही तंबूचा रस्ता धरला. फलकावर तेव्हा अवघ्या 17 धावा लागल्या होत्या. मग डेव्हिड विली हाही 18 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार ठोकले. रुदरफोर्डने 28 तर शाहबाजने 27 धावा कुटल्या.

संबंधित बातम्या

त्यापूर्वी वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल आणि महंमद सिराज यांच्या भेदक मार्‍यापुढे कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजीपुढे त्यांचा निम्मा संघ केवळ 67 धावांतच तंबूत परतला. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभारंभी लढतीत गतविजेत्या चेन्नईला पराभूत करताना जी जिद्द कोलकाता संघाने दाखवली होती तसे प्रदर्शन त्यांना आजच्या लढतीत करता आले नाही. त्यांचा सगळा संघ 18.5 षटकांत 128 धावांमध्ये गारद झाला.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्याचा हा निर्णय अचूक ठरवला तो त्याच्या गोलंदाजांनी. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर अनुक्रमे 9 व 10 धावांवर बाद झाले. नंतरही कोलकाताला ही पडझड रोखता आली नाही. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि धावांना खीळ बसली. कर्णधार श्रेयस अय्यर हाही फार काळ तग धरू शकला नाही. वैयक्तिक 13 धावांवर त्याला हसरंगाने डु प्लेसिसच्या हातात झेल द्यायला भाग पाडले.

नितीश राणा याने 10 तर सॅम बिलिंग्ज याने 14 धावा करून तंबूचा रस्ता धरला. सुनील नारायण हाही 12 धावा करून बाद झाला. कोलकाताचा एकही फलंदाज बंगळुरूच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करू शकला नाही. शेल्डन जॅक्सन याला भोपळाही फोडता आला नाही. एका अप्रतिम चेंडूवर हसरंगाने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. आंद्रे रसेल याने 18 चेंडूंत 25 धावा चोपल्या. त्यामुळे कोलकाता संघाला थोडाफार दिलासा मिळाला. रसेलने 1 चौैकार व तीन षटकार ठोकले. तो रंगात येणार असे वाटत असतानाच हर्षल पटेल याने दिनेश कार्तिकमार्फत त्याला झेलबाद केले.

त्यामुळे बर्‍यापैकी धावसंख्या उभारण्याचे कोलकाता संघाचे स्वप्न भंगले. टिम साऊथी हाही फक्त एक धाव करून बाद झाला. तोही हसरंगाचाच बळी ठरला. हसरंगा याने चार षटकांत अवघ्या 20 धावांच्या मोबदल्यात कोलकाताचे चार गडी बाद केले. त्याला हर्षल पटेल आणि महंमद सिराज याने सुरेख साथ दिली. हर्षल पटेल याने दोन षटांकत दोन बळी घेताना अवघ्या 11 धावा मोजल्या. डेव्हिड विली यानेही सुंदर गोलंदाजी करून कोलकाताच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

कोलकाता नाईट रायडर्स : 18.5 षटकांत 10 बाद 128. (आंद्रे रसेल 25, सॅम बिलिंग्ज 14, वानिंदू हसरंगा 4/20, आकशदीप 3/45)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 19.2 षटकांत 7 बाद 132. (शेरफेन रूदरफोर्ड 28, शाहबाज अहमद 27, टीम साऊथी 3/20, उमेश यादव 2/16)

Back to top button