नाशिक : जिल्ह्यातील सुमारे एक हजार टपाल कर्मचारी संपात ; सेवा ठप्प | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे एक हजार टपाल कर्मचारी संपात ; सेवा ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी ध्येयधोरणांना विरोध करण्यासह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना व फेडरेशन यांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी अर्थात सोमवारी (दि.28) संपात जिल्ह्यातील सुमारे एक हजार डाकसेवकांनी सहभाग नोंदविल्याने टपालसेवा ठप्प झाली होती. जीपीओसह जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयांतील कामकाज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

दोन दिवसीय देशव्यापी संपाला टपाल विभागातील ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन आणि नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. नाशिक जिल्ह्यातील 370 ग्रामीण डाकसेवक, अडीचशेपेक्षा जास्त पोस्टमन तसेच सुमारे अडीचशे लिपिक, पोस्टल असिस्टंटसह सुपरवायझर पदापर्यंतचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी, टपाल वाटपासह दैनंदिन कामकाज रखडले. 80 टक्क्यांहून अधिक कर्मचारी संपावर गेल्याने सर्व सेवा विस्कळीत झाल्याने टपाल विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

दरम्यान, डाकसेवकांच्या संपामुळे टपालाचे वाटप न झाल्याने कार्यालयात पत्रांचा ढीग साचला होता. तर संपाबाबतची माहिती कर्मचार्‍यांना देण्यासाठी द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेत संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष के. के. गायकवाड, संजय उगले, सुनील जगताप, राजाराम जाधव, प्रकाश पाटील, दत्तू हडके आदी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या : कामगारविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, जीडीएससह सर्व कर्मचार्‍यांना विश्वव्यापी सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, सर्व कर्मचार्‍यांना सामूहिक विमा संरक्षण लागू करावे, डाकसेवेचे खासगीकरण थांबवावे, ग्रामीण सेवकांना खात्यात समाविष्ट करून त्यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, ग्रॅच्युइटी 1.50 लाखऐवजी 5 लाख रुपये करावी, 12-24-36 व्या वर्षी पदोन्नती लागू करावी, 180 दिवसांची पगारी रजा मंजूर करावी, विवाहित महिलांना अनुकंपा नियुक्ती आदेश लागू करावा, बंचिंग आदेश लागू करावा.

हेही वाचा :

Back to top button