विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या धोक्यात, मे मध्यापर्यंत चालणार परीक्षा-निकालांचे सत्र? | पुढारी

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या धोक्यात, मे मध्यापर्यंत चालणार परीक्षा-निकालांचे सत्र?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू ठेवून वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर घ्याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावा, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढल्याने राज्यभरातील पालक संतप्त झाले आहेत. या नव्या वेळापत्रकाने विद्यार्थ्यांसह पालकांच्याही उन्हाळी सुट्ट्यांचे प्लॅन किमान पंधरा दिवसांनी धोक्यात आले असून, हा निर्णय रद्द करण्याची मागणी पालक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.

साधारणत:, 15 मार्चपासून शाळा एकवेळ सुरू होतात. मोठ्या शाळा दोन सत्रांत चालतात. एप्रिल मध्यापर्यंत शाळांच्या पातळीवरील परीक्षा आटोपतात आणि मुलांना सुट्टी लागते. 1 मे रोजी निकाल लावण्याची तशी जुनी परंपरा आहे.

शालेय शिक्षण विभागाने हे सर्व नियोजन विस्कटून टाकले. एप्रिल मध्यापर्यंत पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवा, एप्रिलच्या अखेरीस परीक्षा घ्या आणि मेमध्ये निकाल लावा, असे निर्देश शिक्षण खात्याने दिले.

याचा अर्थ उन्हाळी सुट्टी प्रत्यक्षात सुरू होण्यास मेचा अर्धा महिना जाईल. ही सुट्टी सुरू होण्याच्या तारखाही निश्चित नसल्याने मुलांसह कुठे प्रवासाला जाण्याचे बेत करणेही कठीण होऊन बसले आहे.

शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे मात्र शिक्षक, पालकांत गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शाळांनी परीक्षा घेतल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत दहावी-बारावीचे वर्ग भरविण्याचे नियोजन केले असून, 1 मे रोजी निकाल लावला जाणार आहे.

सर्व नियोजन झालेले असताना काढलेले पत्रक कशासाठी व कोणासाठी? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे एप्रिलमध्ये परीक्षा, मेच्या सुरुवातीला निकाल व सुट्टी दिली जावी, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत.

ग्रामीण भागातील बहुतांश शाळा जुलै महिन्यापासून नियमित नियोजनानुसार सुरू आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे. सर्व परीक्षा नियोजित वेळेत पार पडत आहेत. 9 वी व 11 वीच्या परीक्षा काही संस्थांनी घेतल्या असून, उर्वरित परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पार पाडण्याचे नियोजन होते. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली.

एप्रिलमध्ये कडक उन्हाळ्यामुळे शाळा सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारक आहे. अभ्यासक्रम संपवून परीक्षेचे नियोजन झाले आहे. त्यामुळे शासनाने एप्रिल महिन्यात दिवसभर शाळा घेऊन मेमध्ये निकाल लावण्याचा आग्रह धरू नये. मेपासून रीतसर विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टी मिळायला हवी. एस.टी. वाहतूक नाही, ग्रामीण भागात वाहतूक अडचण आहे, उन्हात मुलांनी शाळेत चालत जायचे का, असा सवाल पालक संघटनेचे प्रसाद तुळसकर यांनी केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची स्थिती

प्राथमिक शाळा (शहरी, ग्रामीण) : 2,648, विद्यार्थी संख्या – 2 लाख 98 हजार 11

माध्यमिक शाळा : 1,068,

विद्यार्थी संख्या – 3 लाख 50 हजार

महापालिका शाळा : 59,

विद्यार्थी संख्या – 10 हजार 200

Back to top button