
सातारा : पुढारी वृत्तसेवा
परस्पर सामंजस्य, बंधूभाव, प्रेम, सलोखा आणि विश्वशांती स्थापित होण्यासाठी सातारा शहरातील गांधी मैदान, राजवाडा येथे बुधवारी (30 मार्च) सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत शेकडो ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रघोषात श्री महारुद्र पंचायतन महायज्ञ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नैसर्गिक प्रकोप दूर होण्याबरोबरच सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण व्हावे व जनकल्याणासाठी हा महायज्ञ सोहळा होणार असून येथील वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. या महायज्ञास सर्वांनी उपस्थित राहावे तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक समस्यांचे निवारण या महायज्ञात निश्चित होईल. तरी या महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.
भारतीय धर्मशास्त्रात, नीती शास्त्रात, राजधर्मात आणि मानवी मूल्यांमध्ये यज्ञाला खूप मोठे स्थान आहे. अगदी रामायण, महाभारत, चंद्रगुप्त काळ, विक्रमादित्य, भोजराज, छ. शिवराय यांच्या काळातही त्यावेळच्या शासक, प्रशासकांनी अनेक प्रकारचे यज्ञ केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. दशरथ राजाच्या काळात दुष्काळ, महामारी आदी समस्या दूर करण्यासाठी वशिष्ठांनी यज्ञ करण्याचाच सल्ला दिला होता. युधिष्ठिरानेही राजसूय यज्ञ केला होता. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, वादळे, साथींचे रोग, महायुद्ध, अनाचार, नीतिमत्तेचे पतन याचे निवारण पंचमहाभूतांच्या शुद्धतेने होते, असे मानले जाते. आज वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण यामुळे पृथ्वी संकटात सापडली आहे. सातारा शहर ही एक पवित्र भूमी आहे. नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या सातार्याचे स्थान खूप मोठे आहे. सातार्यात एखादी चांगली घटना घडली तर त्याचे अनुकरण अवघा महाराष्ट्र करेल. गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना महामारीमुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होते, याचे औचित्य साधून सातारा शहरात हा महायज्ञ होणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.