आज, उद्या बँका राहणार बंद | पुढारी

आज, उद्या बँका राहणार बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवीन कामगार कायदे आणि बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक आणि कामगार संघटनांनी दोन दिवसीय राष्ट्रीय संपाची हाक दिल्याने, ऐन मार्चएण्डला दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. शनिवारी, रविवारी सुट्टीचे गेल्यानंतर सोमवारी, मंगळवारीही बँक बंद ठेवाव्या लागणार असल्याने, त्याचा आर्थिक कामकाजांवर परिणाम होणार आहे.

बँकांच्या या नियोजित संपापूर्वी शनिवारी (दि.26) आणि रविवारी (दि.27) बँका बंद होत्या. त्यानंतर संपामुळे सोमवारी (दि.28) आणि रविवारी (दि.29) बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना उर्वरित दोनच दिवसांत मार्चएण्डची कामे करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, बँकांच्या खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच बँक कमर्चारी संघटनांनी आंदोलन अधिक तीव— करण्यासाठी संपाची हाक दिली आहे. या संपात बँकांच्या प्रमुख संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतीय स्टेट बँक व इंडियन ओवरसीज बँक संपात सहभागी होणार नसल्याने, या बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. संपामुळे सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प झाल्यास नेट बँकिंग आणि एटीएमवर ग्राहकांची भिस्त असेल. मात्र, एटीएम व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांना एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड ठेवण्याचे आव्हान असेल. दोन दिवस बँका बंद असल्याने, शहरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट दिसून आला.

जिल्हाभरातील विविध बँकांच्या 350 शाखांमधील तीन हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मंगळवारी गोल्फ क्लब येथे सकाळी 10 वाजता कर्मचार्‍यांतर्फे निदर्शने केली जाणार आहेत. पोलिसांनी सोमवारी परवानगी नाकारल्याने, मंगळवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– आदित्य तुपे, बँक महाराष्ट्र एम्प्लॉइज

कामगारही संपावर
नवीन कामगार कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी सीटू, आयटक या संघटनाही संपात उतरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तसेच एलआयसीचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. याचा औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button