सातारा : ब्लिंक लाईट..तपास झाला ‘टाईट’

ब्लिंक लाईट
ब्लिंक लाईट
Published on
Updated on

 सातारा : विठ्ठल हेंद्रे
सातार्‍यात आठ दिवसांपूर्वी 4 वर्षीय फिरस्त्या कुटुंबातील चिमुरडीचे सराईत गुन्हेगाराने पहाटे अपहरण करत निर्जनस्थळी नेवून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. हा गुन्हा उघडकीस आणताना कोणताही पुरावा नव्हता. केवळ दुचाकीची लाईट बंद-सुरु (ब्लिंक) होत असल्याचे सीसीटीव्हीत दिसूून आले होते. त्यावरून पोलिसांनी छडा लावत तपास टाईट केला. सुमारे 200 सीसीटीव्ही व ब्लिंक होणार्‍या 25 दुचाकींच्या झाडाझडतीनंतर पोलिस संशयितापर्यंत पोहोचले.

गेल्या सोमवारी चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे घटना घडल्याने समाजमन सुन्‍न झाले होते. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. दोन पोलिस ठाणी व एलसीबीसारखी प्रमुख शाखा यासाठी प्रयत्न करत होती. घटनेनंतर तपासाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या हाती काही लागले नाही. सायंकाळी सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर त्यावर पोलिसांनी फोकस केला. सुमारे 200 सीसीटीव्ही फुटेज चाळल्यानंतरही ठोस असा वाहन क्रमांक तसेच संशयित आरोपी असे काहीही दिसत नव्हते. या कुचकामी सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या तपासावर क्षणात मर्यादा आल्या. अस्पष्ट अशा फुटेजवरुन पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. संशयित आरोपी चालवत असलेली दुचाकी एका बाबीने थोडी वेगळी होती. पहाटेची वेळ असल्याने दुचाकीच्या इंडिकेटर लगत एक लाईट बंद-सुरु होत असल्याचे दिसून आले. या वेगळेपणाच्या शोधार्थ पोलिस कामाला लागले. एकट्या सातारा शहर पोलिसांनी ब्लिंक होणार्‍या दुचाकींची शोध मोहीम राबवत तब्बल 25 दुचाकी व त्यांच्या मालकांची पडताळणी केली. मात्र तरीही घटनेची उकल होत नव्हती. अखेर एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ व सातारा तालुक्याचे कारभारी पोनि विश्‍वजीत घोडके यांनी प्राप्‍त झालेले सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे ठरवले. हीच आयडीया कामाला आली. फुटेजमध्ये ब्लिंक होणारी दुचाकी संशयित आरोपीच्या कुटुंबियांपर्यंत पोहचली व त्यांनी पोनि भगवान निंबाळकर यांना फोन करुन त्यांची दुचाकीही तशीच असल्याचे सांगितले. सातारा डीबीने त्याबाबत सर्व पडातळणी केली आणि संशयित आरोपी संकेत गुजर गजाआड झाला.

प्रशस्तीपत्रक घ्यायला न गेलेली टीम डीबी….

24 मार्च रोजी जिल्ह्याची क्राईम मिटींग होती. यावेळी एक महिन्यापूर्वी उत्कृष्ठ काम करणार्‍या पोलिसांचा मिटींगमध्ये एसपींच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरव केला जातो. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने फेब्रुवारी महिन्यात चांगली कामगिरी केली होती. क्राईम मिटींगमध्ये त्यांचा गौरव होणार होता. मात्र 21 मार्च रोजी मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार केलेला नराधम सापडत नसल्याने डीबीचे फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, सुजीत भोसले, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे अस्वस्थ होते. एकीकडे नराधम सापडत नसल्याने दुसरीकडे प्रशस्तीपत्रक घेणे त्यांना योग्य वाटले नाही. यामुळे डीबीची संपूर्ण टीम प्रशस्तीपत्रक घेण्यासाठी उपस्थित राहिली नाही. सुदैवाने याच दिवशी गुन्ह्याची उकल झाली.

कपड्यांसाठी हंकारे तर सीसीटीव्हीला कर्णे..

सोमवारची सकाळ सातारा तालुका, सातारा शहर व एलसीबी पथकाला आव्हानात्मक म्हणून उजाडली होती. अवघ्या 4 वर्षीय मुलीवर पाशवी अत्याचार झाल्याने हे तिन्ही पोलिस एकजूट होवून रात्रंदिवस तपासासाठी पळत होते. रक्‍तबंबाळ अवस्थेत चिमुरडी सापडल्यानंतर तिच्या अंगावरील कपडे बदलायचे होते. यासाठी तालुक्याचे पोलिस हवालदार धोंडिराम हंकारे यांनी खणआळीतील व्यापार्‍याला उठवून मुलीला 5 ड्रेस नेले. दरम्यान, या संपूर्ण घटनेत उकल होण्यासाठी एलसीबीचे अजित कर्णे यांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज महत्वपूर्ण ठरले. त्यांना मिळालेल्या फुटेजनुसार त्यांनी त्यातील महिलेची भेट घेतली. त्यामध्ये महिलेने त्या व्यक्‍तीला ओळखले व त्या नराधमाने त्या महिलेला पैसे देण्याचे आमिष दाखवून 'तसली' मागणी केल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news