गोवा : घराच्या गच्चीवर फुलविली बाग | पुढारी

गोवा : घराच्या गच्चीवर फुलविली बाग

मडगाव : रतिका नाईक
घरासमोर बाग असावी, असे अनेकांना वाटते. त्यातूनच एक-दोन फुलांच्या कुंड्या घरासमोरील खिडकीला किंवा परसात ठेवलेल्याच दिसतात. काही ठिकाणी जागे अभावी ते स्वप्न अधुरेच राहते. परंतु इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते, याची प्रचिती फातोर्डा येथील गुरुदत्त नाईक यांनी गच्चीवर फुलवलेली बाग पाहून येते. नाईक यांनी कामातून वेळ काढून गेल्या दहा वर्षांपासून गच्चीवर बाग फुलवत आली. त्यांनी देशी-परदेशी फुले, फळ झाडांची सुंदर बाग तयार केली आहे.

बागकामाची आवड असलेले नाईक हे सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता आहेत. आतापर्यंत त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी कार्यालय परिसरातही बाग तयार केलेल्या आहेत. दहा वर्षांच्या मेहनतीने त्यांनी घराच्या गच्चीवर बाग तयार केली आहे. त्यात ब्रोकोली सारख्या परदेशी भाजीचे उत्पन्नही त्यांनी घेतले. यंदा सफरचंदाचे लागवड केली असून पीक येण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा नाईक यांनी गाजर आणि बिट भाजीच्या रोपट्यांची लागवड केली आहे.

फूल झाडांमध्ये लिली, 21 प्रकारची जास्वंद इत्यादी 200 प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या वादळात काही फुलझाडांचे नुकसान झाली. फळाझाडांमध्ये किवी, पीच, प्लम, आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, मालबेरी, द्राक्षे आदी प्रकारची लागवड केली आहे. मसाल्यांमध्ये लवंग, हळद, जिंजर आदी प्रकार आहेत. बागेतून मिळणार्‍या उत्पादनामुळे आपला हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे समाधान मिळते, असेही नाईक सांगतात. बॉटनीकल सोसायटी ऑफ गोवाच्या अखिल गोवा स्पर्धेत 2020 मध्ये नाईक यांना पहिले, तर 2021 मध्ये दुसरे बक्षीस मिळाले होते. याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. आपण कार्यालयीन कामात असतो तेव्हा पत्नीसह मुलगा आणि मुलगीही आपल्याला बाग कामात मदत करतात, असे नाईक यांनी सांगितले.

कृषी झोनल अधिकारी संपत्ती धारगळकर, मडगाव कृषी विज्ञान केंद्राचे गीता वेलिंगकर व गिरीश केंकरे यांनी आपल्याला बाग फुलवण्यासाठी वेळोवेळी मोलाची मदत केल्याचे सांगून नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
एखादा मित्र परदेशातून यायचा असल्यास आपल्याला भेटवस्तू आणण्यापेक्षा एखादे झाडच आण, असे आपण सांगतो. मित्रांमुळेच आपल्याकडे परदेशी फळफुलांची झाडे आहेत.
– गुरुदत्त नाईक, फातोर्डा

भाजीचीही लागवड

आतापर्यंत नाईक यांनी बिट, वांगी, सेलॅरी, गाजर, मिरची, टोमॅटो, ब्रोकोली, शेपू , लाल भाजी, वालची भाजी, पालक इत्यादी अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी टोमॅटो तर यंदा मिरचीचे बंपर उत्पन्न आल्याचे नाईक यांनी सांगितले.

Back to top button