

तळमावले : पुढारी वृत्तसेवा
एस. टी. चा संप सुरू झाल्यापासून सर्वात जास्त हाल ग्रामीण भागातील नागरिकांचे झाले आहेत. अतिदुर्गम भागामध्ये धावणार्या एस.टी.ची चाके पूर्णपणे थांबली आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत तसेच इतर वर्गांच्या देखील परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. एस.टी.च्या फेर्या ग्रामीण भागामध्ये बंद झाल्या आहेत. यामुळे येथे दळणवळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. डोंगर दर्यावरील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी शाळेपर्यंत वेळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे एस.टी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना अजून किती दिवस अशी परीक्षा द्यावी लागणार हे ते संपकरी आणि सरकारला सांगता येईल का? असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील विद्यार्थी विचारीत आहेत. सरकारच्या वतीने या संपावर तोडगा काढणे आवश्यक होते, मात्र तसे होताना दिसत नाही. शहरामध्ये एस.टी.च्या फेर्या सुरू आहेत. त्यांना याची झळ बसत नाही मात्र एस.टी. बंदचे चटके ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावे लागत आहेत. या संपामुळे मुक्कामी एस.टी. बंद आहेत. तसेच दुर्गम भागामध्ये देखील एसटी बंद आहे. याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना तसेच अबालवृद्धांना होत आहे. पाटण तालुका हा दुर्गम भाग असलेला तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. बरीच गावे डोंगर दर्यामध्ये वसली आहेत. या लोकांना शहरी भागामध्ये येताना अडचणी येत आहेत. काही गावामध्ये खाजगी वाहतूक नाही त्यामुळे या लोकांना एसटीवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र एस.टी.च्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे या दुर्गम भागामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून एस.टी. फिरकली नाही. यामुळे डोंगरावर राहणार्या नागरिकांना एखाद्याला रुग्णालयात नेताना अडचणी येत आहेत. यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. एसटीचा संप लवकर मिटावा म्हणून सरकारच्या वतीने हालचाली सुरू आहेत. मात्र याला यश म्हणावे असे मिळाले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संप करणार्या कर्मचार्यांना शेवटचा अल्टिमेट दिला असून दि. 31 मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावे अन्यथा होणार्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने याबाबत सामंजस्याचे धोरण अवलंबावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
संपामुळे ग्रामीण भागातील काही गावांमध्ये एस.टी. बस बंद आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परीक्षा सुरू आहेत. एस.टी.चा संप लवकर मिटने आवश्यक आहे.
– योगेश पाटणकर