यंदा लगीनघाई जोरात! मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, वाजंत्रींना डिमांड | पुढारी

यंदा लगीनघाई जोरात! मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, वाजंत्रींना डिमांड

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे लोकांच्या जीवनपद्धतीवर निर्बंध आले होते. त्यामध्ये सुख-दु:खाच्या प्रसंगांनाही नियमांच्या अधीन राहून सामोरे जावे लागत होते. त्याला लग्न समारंभही अपवाद नव्हते. इच्छा असूनही लोकांना निमंत्रण देता येत नव्हते. अनेकदा लग्न करून वधू-वर घरी आल्यानंतरच कॉलनीत किंवा गल्लीतील लोकांना लग्न झाल्याचे कळायचे. आता मात्र कोरोनाचे निर्बंध हटल्याने लगीनसराई धडाक्यात सुरू आहे.

एप्रिल ते जुलै या कालावधीत लग्नाचे तब्बल 42 मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात 11, मेमध्ये 14, जूनमध्ये 12 व जुलैमध्ये 5 मुहूर्त आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे धूमधडाक्यात लग्न होणार असल्याने मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, बेंजो, बँड पथकांना यावर्षीचा मुहूर्त लाभदायी ठरणार आहे.

कोरोनाचा मोठा फटका मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, बँड, बेंजो तसेच याच्याशी संबंधित असणारे कारागीर, कामगार यांना बसला. गेल्या दोन वर्षांत पंचवीस, पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्ने झाली. त्यामुळे लग्न समारंभाशी संबंधित असणारे सर्व व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले होते. गेल्या दोन वर्षांपासून थांबलेले अर्थचक्र आता हळहळू गती घेऊ लागले आहे. यावर्षी लग्नाचे मुहूर्तदेखील चांगले आहेत. एप्रिल व मे महिन्यांत साधारणपणे एक दिवस आड लग्नाचा मुहूर्त आहे. त्यामुळे लगीनघाई जोरात आहे.

Back to top button