नाशिक : महिलेने एकाचवेळी दिला तीन बाळांना जन्म, तिन्ही बाळांसह आईचीही प्रकृती ठणठणीत | पुढारी

नाशिक : महिलेने एकाचवेळी दिला तीन बाळांना जन्म, तिन्ही बाळांसह आईचीही प्रकृती ठणठणीत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ; एखाद्या महिलेने एकाचवेळी दोन बाळांना जन्म देणे ही बाब आता तशी सर्वसामान्य झाली आहे, मात्र म्हसरूळ- मखमलाबाद रोड येथील एका महिलेने तीन बाळांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. तीन बाळांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश असून, तिन्ही बाळांसह आईचीही प्रकृती ठणठणीत आहे.

म्हसरूळ- मखमलाबाद रोड भागातील गायत्री गणेश महाले यांना प्रसूतीसाठी पंचवटीतील एका रुग्णालयात बुधवारी (दि.16) दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री 9:00 वाजून 52 मिनिटांनी त्यांची प्रसूती झाली. यावेळी त्यांनी एकापाठोपाठ तीन बाळांना जन्म दिला. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी झालेल्या पहिल्याच प्रसूतीत गायत्री यांनी तीन अपत्यांना जन्म दिला आहे. तीनही चिमुकल्यांच्या जन्म वेळेत अवघ्या एक-एक मिनिटांचे अंतर असून, तीनही बाळांचे वजन अनुक्रमे पहिले-2 किलो 100 ग्रॅम, दुसरे- 2 किलो फक्त, व तिसरे- 1 किलो 900 ग्रॅम असे आहे. आई-बाळांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना तीन-चार दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी भानसी व महाले कुटुंबीयांकडून त्यांच्या निवासस्थानी आईसह तीन चिमुकल्यांचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले.

अपत्य होण्यासाठी योग्य उपचार घेण्यास आत्या माजी महापौर रंजना भानसी यांनी सुचविलेल्या रुग्णालय आणि डॉक्टरांकडे आम्ही गेलो. उपचाराचे फळ अपत्यांच्या रूपाने मिळाले आहे. डॉ.नंदा ठाकरे यांच्यासह कर्मचार्‍यांचे आभार.
– गणेश महाले, बाळांचे वडील

मला जेव्हा सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, गायत्रीच्या पोटात तीन बाळ आहेत. तेव्हा मी विचारात पडले होते. पण, मी हे आव्हान स्वीकारले. गायत्रीने कोणतीही भीती न ठेवता माझ्या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिला.
– डॉ. नंदा ठाकरे, नाशिक

हेही वाचा :

Back to top button