नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापौरांचे निवासस्थान असलेले रामायण सोडण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने आयुक्तांवर दबाव आणला आणि त्यामुळेच आपल्याला निवासस्थान सोडण्यास भाग पाडले असून, महाराष्ट्रात राज्य शासनाकडून अशा प्रकारचे दबावतंत्र सर्वत्र सुरू असून, नाशिकही त्याला अपवाद नसल्याचा आरोप माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.
प्रशासनासह महाविकास आघाडीविषयी नाराजी व्यक्त करतानाचा माजी महापौर कुलकर्णी यांनी 17 मार्चला महापौर निवासस्थानही सोडले. प्रशासनाकडून मिळालेल्या वागणुकीसंदर्भात त्यांनी खंत व्यक्त केली. गेल्या 13 मार्च रोजी चालू पंचवार्षिकमधील कार्यकाळ संपुष्टात आला. मागील पूर्ण महिना आपण मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन व आयटी परिषद यात बराच काळ व्यग्र होतो. त्यामुळे कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या शेवटच्या काळात विकासकामे व इतर कामे करण्यासाठी मला महापौर निवासस्थान 10 ते 15 दिवस उपलब्ध व्हावे म्हणून प्रशासनाला पत्र दिले होते. तसेच 15 मार्चला आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चाही केली होती.
18 ते 20 मार्च अशी सलग तीन दिवस सुटी असल्याने 31 मार्चपर्यंत 'रामायण' निवासस्थान वापराबाबत आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली होती. असे असताना 14 ते 31 मार्चपर्यंत प्रतिस्क्वेअर फूट भाडे द्यावे लागेल, असे पत्र प्रशासनाने पाठविले व लगेच 'रामायण'वरील कर्मचारीही काढून घेतले. त्यामुळे प्रशासनाची भूमिका समजल्याची खंत माजी महापौरांनी व्यक्त केली आहे. नगरसेवकांची रखडलेली विकासकामे व समस्या शहर विकासासाठी मार्गी लागाव्यात व कामांचा पाठपुरावा व्हावा, हा या हेतूने 'रामायण' निवासस्थान मिळण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी सांगितले. माझ्या महापौर कार्यकाळात कोरोना प्रादुर्भाव आला. परंतु, अशाही परिस्थितीत नाशिक शहरासाठी सक्षमपणे आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मी पूर्ण समाधानी आहे.
आयुक्तांबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलो. नाशिक शहराचा जास्तीत जास्त विकास व्हावा, यासाठी महापौर या नात्याने तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून शहर विकासाच्या योजनांसाठी भरीव कामांची पायाभरणी केल्याचा दावाही माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला.