मुलांप्रमाणे प्रौढांनाही असते ‘ही’ मानसिक समस्या | पुढारी

मुलांप्रमाणे प्रौढांनाही असते ‘ही’ मानसिक समस्या

न्यूयॉर्क :  ‘टेन्शन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर’ म्हणजेच ‘एडीएचडी’ ही समस्या बहुतांशी लहान मुलांमध्ये आढळते. मात्र, अनेकवेळा प्रौढ लोकही या समस्येच्या विळख्यात सापडतात. हा एक असा मानसिक समस्या आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या मेंदूचा विकास सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असतो किंवा योग्यप्रकारे नसतो.

‘एडीएचडी’ इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, जगभरात 18 ते 44 वर्षे वयाच्या 2.8 टक्के लोकांना हा विकार आहे. योग्यवेळी त्याची तपासणी व उपचार झाले नाहीत, तर त्याची लक्षणे वयाबरोबर आणखी तीव्र होऊ शकतात. त्याच्या लक्षणांमध्ये एकाग्रतेचा अभाव, अतिएकाग्रतेने काम करणे, विस्मरण, उतावळेपणा, स्वतःबाबत नकारात्मक छबी बनवणे, नियोजन कौशल्य नसणे, वेळेचे भान नसणे अशा अनेक लक्षणांचा समावेश होतो. काही लोकांना मन एकाग्र करता येत नाही, तर काही लोक छोट्या-छोट्या गोष्टींकडेही अतिशय लक्ष देतात.

अनेकांना तारीख, दिवस, नाव वगैरे लक्षात राहत नाही. संवादावेळी मध्येच सतत बोलणे, उतावळेपणाने प्रतिक्रिया देणे, असे प्रकार केले जातात. अशा लोकांचा मेंदू कधी शांत राहत नाही. चिडचिडेपणा आणि सतत मूड खराब असणे ही लक्षणे दिसतात. अनेकांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसते व त्यांना चुकीच्या सवयीही लागतात. अशा रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. ‘एडीएचडी’ माईल्ड म्हणजेच सौम्य असल्यावर कॉगनिटिव्ह बिहेव्हिरियल थेरेपीची मदत घेतली जाऊ शकते. ध्यानधारणा, योग, तणावावर नियंत्रण ठेवणे, पौष्टिक आहार, पुरेशी झोप यामुळे समस्या कमी होऊ शकते.

Back to top button